प.बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस खासदाराच्या मागणीने राहुल गांधी अडचणीत

काँग्रेस खासदाराच्याच या मागणीने काँग्रेस अडचणीत

Updated: Feb 4, 2019, 12:54 PM IST
प.बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस खासदाराच्या मागणीने राहुल गांधी अडचणीत title=

कोलकाता : पश्चिम बंगाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार रंजन चौधरी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. शारदा चिटफंड गैरव्यवहारात लाखो लोकांना लुटण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्याच नेत्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्ष आता यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहावं लागेल.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. या प्रकरणी अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी राज्यपालांना केल्या आहेत. या अहवालानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यपाल त्रिपाठी यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पाचारण केलं आहे. 

शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी तपास करण्यासाठी रविवारी संध्याकाळी सीबीआयचे पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र त्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलं. बंगाल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्यरात्री त्यांची सूटका केली. यानंतर कोलकाता पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी स्वतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दाखल झाल्या. सध्या मोदी सरकारविरोधात ममता बॅनर्जी धरणं आंदोलन करत आहेत.