Lok Sabha Election 2019: एअर स्ट्राईकनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे का ?

देशात २६ फेब्रुवारीनंतर चित्र बदललं ?

शैलेश मुसळे | Updated: Mar 5, 2019, 01:19 PM IST
Lok Sabha Election 2019: एअर स्ट्राईकनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे का ? title=

Lok Sabha Election 2019: मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये जवळपास २५ वर्षानंतर सपा आणि बसपामध्ये आघाडी झाली. पण या दोन्ही पक्षाने काँग्रेसला या आघाडीपासून लांब ठेवत मोठा झटका दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे मोठं नुकतान होण्याची चिन्ह आहेत. सपा-बसपा एकत्र आल्याने काँग्रेस एकटी पडली. महाआघाडीची चर्चा सुरु असताना मायावती आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसला दूर केलं. ज्यामुळे काँग्रेसला नवी रणनीती आखावी लागली. काँग्रेसने पर्याय नसल्याने युपीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली. यासाठी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणलं. प्रियंका गांधी यांना राजकारणात आणल्याने युपीत काँग्रेसला फायदा होईल असं काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे युपीची जबाबदारी त्यांना देण्यात आली. सपा-बसपा एकत्र आले तरी काँग्रेसला याचं नुकसान होणार नाही असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होतं. पण २६ फेब्रुवारीला चित्र बदललं आणि काँग्रेस बँकफूटवर गेली.

काँग्रेस बॅकफूटवर

काँग्रेस पक्ष राफेल, कर्जमाफी, बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवर सत्तेत असलेल्या भाजपवर टीका करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत होता. पण २६ फेब्रुवारीला दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर हल्ला करत सरकारने पुन्हा एकदा काँग्रेसला बॅकफूटवर ढकललं. एअर स्ट्राईकनंतर देशात पुन्हा भाजपसाठी चांगलं वातावरण तयार झालं. भाजप एअर स्ट्राईकचं क्रेडिट देखील घेत आहे. पंतप्रधान मोदींनी तर देश हा सुरक्षित हातात असल्याचं जाहीर सभेत म्हटलं. पण आता काँग्रेसला यामुळे पुन्हा एकदा रणनीती बदलावी लागणार आहे. विरोधी पक्षांना आपल्या सोबत घेण्यात काँग्रेसला अजूनही यश आलेलं नाही. पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशमध्ये स्वबळाच्या भूमिकेत प्रादेशिक पक्ष दिसत आहेत. एअर स्ट्राईकनंतर मात्र आता इतर विरोधी पक्षांना देखील रणनीती बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.

विरोधकांना रणनीती बदलावी लागणार

काँग्रेससह आता इतर भाजप विरोधी पक्षांना देखील आपली रणनीती बदलावी लागणार आहे. एअर स्ट्राईकमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सक्षम सरकार आणि फिर एक बार मोदी सरकारची घोषणा देण्यास भाजपने सुरुवात केली आहे. युपीत सपा-बसपाला पण थोडी भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच २ महिन्यापूर्वी काँग्रेसला जवळ न करण्याची भूमिका घेणारे हे दोन्ही पक्ष आता काँग्रेसला आघाडीत सहभागी करुन घेण्याचा विचार करत आहेत. त्यामुळेच सपा-बसपाने काँग्रेसला १० जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सत्ता मिळवण्यासाठी युपी हे अतिशय महत्त्वाचं राज्य असल्याने येथे एका मतदानाला देखील मोठं महत्त्व आहे. त्यामुळे भाजप विरोधातील मतदारांचं विभाजन होऊ नये अशी सपा-बसपाची भूमिका आहे. याआधी सपा-बसपाने काँग्रेसला फक्त रायबरेली आणि अमेठी या २ जागा सोडल्या होत्या. पण आता काँग्रेसला पुन्हा ऑफर देण्यात आली आहे. इतक्या कमी जागांची ऑफर काँग्रेस स्विकारेल का हे पाहावं लागणार आहे.

'आप'ला सोबत घेण्यासाठी काँग्रेसची तयारी

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित यांनी स्थानिक नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आम आदमी पक्षाला सोबत घ्यावे की नाही याबाबत कोणताच निर्णय नाही होऊ शकला. अनेक जण यासाठी सहमत नव्हते. शीला दीक्षित यांनी म्हटलं होतं की, यावर अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच घेतील. पण आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसला आपची गरज भासू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा सल्ला दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये होऊ शकतो बदल

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकातामध्ये २० विविध पक्षांच्या नेत्यांना एकाच मंचावर आणलं होतं. पण भाजपचा जोर पाहता ममता बॅनर्जी या काँग्रेससोबत एकत्र लढू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षामध्ये सहमती झाली असली तरी सीपीएमवरुन घोडं अडलं आहे. तृणमूल आणि सीपीएम हे एक दुसऱ्यांचे कट्टर विरोधक आहे. सीपीएमने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत ६ जागांवर चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. सीपीएम नेता सीताराम येच्युरी यांनी म्हटलं की, केंद्रीय समितीने पश्चिम बंगालमध्ये ६ जागांवर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.'

लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. अनेकांनी आपली रणनीती ठरवली आहे. पण रोज घडणाऱ्या विविध घडामोडींमुळे विरोधकांना आणि सत्तेत असलेल्या भाजपला देखील रणनीती बदलावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी अजून काय-काय घडामोडी घडतात आणि त्याचा निवडणुकीवर कसा परिणाम होतो हे देखील पाहावं लागणार आहे.