Kedarnath Temple Viral Video: केदारनाथ मंदिरात (Kedarnath Temple) एक संतापजनक घटना घडली असून यामुळे अनेक शिवभक्त दुखावले गेले आहेत. मंदिरात भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर (Shivling) नोटांची उधळण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) सफेद रंगाची साडी नेसलेली महिला मंदिरातील भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर (Shivling) नोटांची उधळण करताना दिसत आहे. यानंतर अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.
उत्तराखंड पोलिसांनी या घटनेची दखल घेतली संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगावर नोटांचा वर्षाव करतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडीओत दिसत आहे की, महिला सफेद रंगाची साडी नेसून गाभाऱ्यात उभी आहे. यावेळी ती समोर असणाऱ्या शिवलिंगावर नोटांची उधळण करत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्या बाजूला मंदिरातील भटजी उपस्थित होते. मात्र त्यांच्यापैकी कोणीही तिला रोखलं नाही. मंदिरात फोटो आणि व्हिडीओ काढण्यास मज्जाव असतानाही हा व्हिडीओ शूट कसा करण्यात आला असाही प्रश्न विचारला जात आहे.
Woman Showers Currency Notes On Shivling Inside #kedarnath Temple, Draws Flak For Disgraceful Act .#Kedarnath #BanAdipurush pic.twitter.com/K36NtnVnDq
— Das Vanthala (@DasVanthala) June 19, 2023
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकार्यांकडून स्पष्टीकरण मागितले असून यासंदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशीही बोलून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, ज्याच्या आधारे आम्ही गुन्हा नोंदवला आहे. आम्ही तपास पूर्ण केल्यानंतर कायदेशीर कारवाई करू,” अशी माहिती रुद्रप्रयागचे पोलीस महासंचालक विशाखा अशोक भदाणे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रद्धा किंवा धर्माचा अपमान करत धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक कृत्य केल्याचा हा गुन्हा आहे.