कोरोनाचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला फटका, देशातल्या कार उत्पादनला स्थगिती

भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. 

Updated: Mar 22, 2020, 09:53 PM IST
कोरोनाचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला फटका, देशातल्या कार उत्पादनला स्थगिती title=

मुंबई : भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३४०च्या वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जीवितहानीसोबतच आता आर्थिक नुकसानही व्हायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे भारतातल्या कार उत्पादक कंपन्यांनी कारचं उत्पादन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, महिंद्र एण्ड महिंद्र, मर्सिडिज बेन्झ आणि फियाट क्रिसलेर यांनी आपण कोरोनामुळे कार उत्पादन थांबवत असल्याचं सांगितलं आहे.

भारताआधी कार उत्पादक कंपन्यांनी मागच्याच आठवड्यात युरोप, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये कारचं उत्पादन थांबवलं होतं. जगभरामध्ये कोरोनामुळे १३ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आङे. 

एसयूव्ही बनवणाऱ्या महिंद्रा एण्ड महिंद्राने त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी व्हँटिलेटर बनवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. फेरारी आणि फियाट या कंपन्यांनीही त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये व्हँटिलेटर बनवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातल्या अनेक राज्यांमध्ये उद्यापासून ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र्ताही उद्यापासून ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र बाहेर जाता येणार नाही. रेल्वेनेही आपल्या सेवा ३१ मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. तसंच राज्यातील बससेवाही थांबवण्यात आली आहे.