नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हीसांना सरकारने स्थगिती दिली आहे. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हीसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसांना वगळण्यात आलंय.
केंद्र सरकारने आतापर्यंत कोरोनाग्रस्त देशामधून ९४८ जणांची सुटका केली आहे. यापैकी ९०० जण भारतीय तर उरलेले ४८ जण इतर देशांचे रहिवासी आहेत. हे ४८ नागरिक मालदीव, म्यानमार, बांगलादेश, चीन, अमेरिका, मादागासकार, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरु या देशांचे आहेत.
महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रवेश झाला आहे. राज्यामध्ये कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. यातले ८ रुग्ण पुण्याचे, २ रुग्ण मुंबईचे आणि १ रुग्ण नागपूरचा आहे. नागपूरमध्ये सापडलेला रुग्ण हा अमेरिकेतून भारतात परतला आहे. तर मुंबई आणि पुण्याचे रुग्ण ग्रुपने परदेशामध्ये गेले होते.
महाराष्ट्रात आढळलेल्या या रुग्णांच्या संपर्कात नेमकं कोण कोण आलं आहे, हे पाहण्याचं आव्हान आता असणार आहे. राज्यात आढळलेल्या रुग्णांना झालेली कोरोनाची लागण सौम्य आहे. कोरोनाचा कोणताही रुग्ण गंभीर किंवा अतिगंभीर नाही, ही दिलासादायक बाब आहे.
परदेशातून आलेल्या नागरिकांनी गर्दीपासून लांब राहावं, तसंच घरातही वेगळं राहावं. गर्दीचे आणि सणावाराचे कार्यक्रम टाळा. सगळ्यांनी मास्क लावून फिरण्याची गरज नाही, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे शाळा-कॉलेज बंद करण्याची गरज सध्यातरी नसल्याचं सरकारला वाटत आहे. कोरोनामुळे राज्य सरकारचं अधिवेशन शनिवार किंवा रविवारी संपवण्यात येणार आहे.