नवी दिल्ली : चीनमध्ये फैलाव झालेल्या कोरोना व्हायरसने आता संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. इरान, जर्मनी आणि इटलीनंतर आता भारतात देखील कोरोनाचे ५ रुग्ण अढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वी भारतात कोरोनाचे दोन रुग्ण अढल्याची घोषणा केली. त्यानंतर आता नोएडामध्ये कोरोना व्हायरस संबंधी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याचदरम्यान एका शाळेने विद्यार्थांच्या परीक्षा देखील पुढे ढकलल्या आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार शाळेतील एका विद्यार्थांच्या वडिलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे शाळेने तात्काळ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
तेलंगणामध्ये देखील एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत आढळलेला कोरोनाचा रुग्ण इटलीहून आला होता. दुसरा इसम दुबईतून आला होता. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत असून दोघांची तब्येत ठिक असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात नव्याने ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमध्ये २,९१२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच नव्या रिपोर्टनुसार आणखी ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील कोरोनो विषाणू बाधितांचा आकडा जाहीर केला आहे.