कोरोना: गेल्या 5 दिवसात रुग्णांमध्ये मोठी वाढ, पाहा प्रत्येक राज्यातील स्थिती

देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली

Updated: May 19, 2020, 02:28 PM IST
कोरोना: गेल्या 5 दिवसात रुग्णांमध्ये मोठी वाढ, पाहा प्रत्येक राज्यातील स्थिती title=

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात 3163 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसांत 23 हजाराहून अधिक रुग्ण देशात वाढले आहेत. 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 19 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार देशातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 101,139 वर पोहोचली आहे. देशात उपचार सुरु असलेल्या रूग्णांची संख्या 58,802 आहे तर 39,174 रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4970 रुग्ण आढळले आहेत आणि या काळात 134 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. 14 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 78,003 होती तर मृतांची संख्या 2549 आहे. म्हणजेच गेल्या पाच दिवसांत कोरोनाची 2336 रुग्ण वाढले आहेत, तर 614 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रभाव महाराष्ट्रात सर्वाधिक दिसत आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 35,058 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 2005 नवे रुग्ण वाढले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8437 रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत 1249 लोकांना बळी गेला आहे. महाराष्ट्र केवळ सर्वाधिक रुग्णच नाही तर रिकव्हरी रेट देखील इतर राज्यांपेक्षा कमी आहे. परिस्थिती अशी आहे की सामान्य लोकांव्यतिरिक्त डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसही मोठ्या संख्येने कोरोना संसर्गामुळे त्रस्त आहेत. हेच कारण आहे की केंद्र सरकारची परवानगी असूनही महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन 4.0. मध्ये फारच कमी दिलासा दिला आहे.

महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात आणि दिल्ली ही सर्वाधिक कोरोना बाधित राज्ये आहेत. तामिळनाडूमधील एकूण रुग्णांची संख्या 11,760 वर पोहोचली आहे आणि मृतांचा आकडा येथे 81 आहे. गुजरातमधील रूग्णांची संख्या 11,745 आहे तर 694 लोक मरण पावले आहेत. गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. आतापर्यंत दिल्लीत रूग्णांची एकूण संख्या 10054 आहे तर 4485 लोक बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण

राजस्थान - 5507 - 138 मृत्यू

मध्य प्रदेश - 5236 - 252 मृत्यू

उत्तर प्रदेश - 4605 - 118 मृत्यू

पश्चिम बंगाल - 2825 - 244 मृत्यू

आंध्र प्रदेश - 2474 - 50 मृत्यू

पंजाब - 1980 - 37 मृत्यू

तेलंगणा - 1597 - 35 मृत्यू

बिहार - 1391 - 9 मृत्यू

जम्मू-काश्मीर - 1289 - 15 मृत्यू.

कर्नाटक - 1246 - 37 मृत्यू

हरियाणा - 928 - 14 मृत्यू

ओडिशा - 876 - 4 मृत्यू

केरळ - 630 - 4 मृत्यू

याशिवाय इतर राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 500 च्या खाली आहे. परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे लॉकडाउन 3 मध्ये दिलासा मिळाल्यापासून, देशात कोरोना रूग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. 4 मे पर्यंत कोरोनाची लागण होणारी संख्या 45 हजारांच्या खाली होती, जी आता एक लाखांच्या पुढे गेली आहे. आता लॉकडाउन 4 सुरू झाले आहे. पण जवळजवळ संपूर्ण देशात नियमांसह व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाची चिंता वाढू शकते.