कोरोना: नियमांचं उल्लंघन केल्यास या राज्यात २ वर्षाची शिक्षा, १ लाखापर्यंत दंड

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या राज्य सरकारचा निर्णय

Updated: Jul 23, 2020, 03:26 PM IST
कोरोना: नियमांचं उल्लंघन केल्यास या राज्यात २ वर्षाची शिक्षा, १ लाखापर्यंत दंड title=

रांची : देशात कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या १२ लाखांच्या वर गेली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारांनी दिलेली सूट मागे घेणे सुरू केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, झारखंड सरकारने कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणार्‍यांना शिक्षा देण्याचे ठरविले आहे. सरकारच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास २ वर्षांची शिक्षा आणि एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.

हेमंत सोरोन सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यासाठी अध्यादेश आणला होता. मंत्रिमंडळात एकूण 39 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. राज्य सरकारने झारखंडचा लोगो लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लोगो 15 ऑगस्ट रोजी लान्च केला जाईल.

झारखंडमध्ये गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 439 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 6682 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3,570 लोकांवर उपचार सुरू असून 3,048 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.