आता कोरोनाचा नाश अटळ! भारताची कोरोनानाशक पावडरची चाचणी यशस्वी

. कोरोनावरील लसीपाठोपाठ  कोरोनावरील औषधातही भारताने ‘आत्मनिर्भरता’ सिद्ध केली आहे

Updated: May 9, 2021, 12:17 PM IST
आता कोरोनाचा नाश अटळ! भारताची कोरोनानाशक पावडरची चाचणी यशस्वी

कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात माणसांच्या बाजूसाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनावरील लसीपाठोपाठ  कोरोनावरील औषधातही भारताने ‘आत्मनिर्भरता’ सिद्ध केली आहे. ‘डीआरडीओ’तील भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनावरील उपचारासाठी ‘2-डीजी’ हे औषध विकसित केले असून, त्याच्या ठिकठिकाणी झालेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. 

चाचण्यांतून उपलब्ध डेटाच्या आधारे ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने शनिवारी या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ‘ड्रग 2-डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (2-डीजी) असे या औषधाचे विस्तृत नाव असून, कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारात ते एक उत्तम पर्याय ठरणार आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला, त्या रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.

हे औषध कोरोनाचे संक्रमण रोखण्यात तसेच रुग्णाला जलदगतीने बरे करण्यात यशस्वी ठरले आहे. औषध ‘डीआरडीओ’च्या (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन’ प्रयोगशाळेने ‘डॉ. रेड्डीज् लॅबोेरेटरी’च्या मदतीने तयार केले आहे. या औषधाने रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल सुधारते, हे सुरुवातीच्या चाचण्यांमध्येच समोर आले होते.

दुसर्‍या टप्प्यात 110 रुग्णांवर चाचणी

‘डीआरडीओ’ने मे 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर औषधाची दुसर्‍या टप्प्याची चाचणी सुरू केली होती. ऑक्टोबर 2020 पर्यंत चाललेल्या चाचणीच्या प्रक्रियांमध्ये हे औषध सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले. दुसर्‍या टप्प्यातील चाचणीत 17 रुग्णालयांतील 110 रुग्णांवर औषधाचा परिणाम तपासण्यात आला. 

तिसर्‍या टप्प्यात 220 रुग्णांवर चाचणी

डिसेंबर 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंत 220 कोरोना रुग्णांवर तिसर्‍या टप्प्यातील चाचणी घेण्यात आली. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूतील मिळून 27 रुग्णालयांतून ही चाचणी झाली. चाचणीदरम्यान तिसर्‍या दिवशी रुग्णाचे ऑक्सिजवरील अवलंबित्व 42 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत घटल्याचे निदर्शनाला आले.

अडीच दिवसांतच परिणाम

एप्रिल 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हैदराबाद येथील ‘सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी’च्या सहकार्याने औषधाची प्रयोगशाळेत चाचणी झाली. ‘स्टँडर्ड ऑफ केअर’ मानदंडांसह तौलनिक पडताळणीअंती अडीच दिवसांतच हे औषध रुग्णामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत असल्याचे समोर आले.

पाण्यात विरघळून दिले जाते

औषध पावडरच्या स्वरूपात असून, ते पाण्यात विरघळून रुग्णाला प्यायला दिले जाते. औषध थेट संक्रमण असलेल्या पेशींपर्यंत पोहोचते आणि विषाणूची वाढ संपवून टाकते. महत्त्वाचे म्हणजे, या औषधाचे प्रचंड उत्पादन सहज केले जाऊ शकते.

द‍ृष्टिक्षेपात ‘2-डीजी’

फायदे काय?

* ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करते
* रुग्णाला लवकर बरा करते
* आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह करते

कसे घेतात?

* हे औषध पाकिटात पावडरच्या स्वरूपात असते
* पाण्यात मिसळून, विरघळून ते रुग्णाला दिले जाते

केव्हा, कुठे चाचण्या?

* मे 2020 ते मार्च 2021 दरम्यान
* देशातील 27 कोरोना रुग्णालयांतून

ट्रायल झालेली राज्ये

* महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू