मुंबई : देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आज बैठक होणार आहे. देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनमध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे. आतापर्यंतची देशातील विविध राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा पंतप्रधान या बैठकीत आढावा घेण्याची शक्यता आहे.
३ मे नंतर लॉकडाऊन कायम ठेवायचा की नाही? लॉकडाऊन कायम ठेवायचा असेल, तर त्यात आणखी काय सुट देता येईल? याचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती, केंद्राकडून असलेली अपेक्षा आणि लॉकडाऊनबाबत राज्य सरकारची भूमिका याबाबत उद्धव ठाकरे या बैठकीत भूमिका मांडतील. सकाळी १० वाजता व्हिडिओ मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सला सुरुवात होणार आहे.
कोरोनासंदर्भात सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची पंतप्रधानांची ही तिसरी वेळ असेल. मागच्यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अडकेलेल्या परप्रांतीय मजूर आणि कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात यावी, अशी मागणी केली होती.