लॉकडाऊन काळात सुरक्षा दलांकडून तब्बल 'इतक्या' दहशतवाद्यांच्या खात्मा

दहशतवादाच्या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज   

Updated: Jun 12, 2020, 02:37 PM IST
लॉकडाऊन काळात सुरक्षा दलांकडून तब्बल 'इतक्या' दहशतवाद्यांच्या खात्मा  title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : Coronavirus कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात देशातील नागरिक या विषाणूशी लढत असतानात जम्मू काश्मीर येथील भागामध्ये सुरक्षा दलांतील जवान दहशतवादाच्या व्हायरशी लढत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार देशभरात लागू असणाऱ्या ल़ॉकडाऊनच्या काळात म्हणजेच जवळपास १ एप्रिल ते १० जूनपर्यंतच्या काळात जम्मू काश्मीर भागात झालेल्या विविध कारवायांमध्ये सुरक्षा दलांनी जवळपास ६८ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 

सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडून या भागात सर्वाधिक हल्ले आणि दहशतवादी हालचाली केल्या गेल्या. ज्यामध्ये परिणामी हिज्बुलच्या ३५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. जून महिन्यापर्यंत ठार करण्यात आल्या दहशतवाद्यांमध्ये दहाजण परदेशी असल्याचंही स्पष्ट झालं. ज्यांची ओळख अद्यापही पटली नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात २३ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मागील तीन महिन्यांमध्ये एकट्या हिज्बुलच्याच सर्वाधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. दहशतवादी कारवाईला समूळ ठेचून टाकण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुरक्षा दलाची ही कामगिरी पाहून थक्क व्हायला होत आहे. 

जानेवारी महिन्यापासूनची आकडेवारी पाहिली असता या काळात जवळपास १०० दहशतवादी ठार झाले आहेत. ज्यामध्ये लष्करपासून जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुलच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या कारवायांमध्ये बहुतांश म्हणजेत २८ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. 

 

सध्याच्या घडीला हाती आलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी कारवायांना नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरीही, मागील वर्षाच्या तुलनेत अद्यापही हा आकडा आणखी वाढणं अपेक्षित आहे. मागील वर्षी म्हणजे ३० जून पर्यंत सुरक्षा दलांनी या भागात एकूण १२५ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जून महिना अखेर येण्यास अद्यापही पंधरवडा शिल्लक आहे तेव्हा या काळात जम्मू काश्मीर भागात दहशतवाद्यांचे मनसुबे ठेचण्यास सुरक्षा दलं नेमकी कोणती पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.