कोरोनाच्या हाहाकारामुळे चार धाम यात्रांबाबत सरकारचा मोठा निर्णय

 कोरोना संसर्गाचे थैमान देशभरात सुरू आहे. रोज 3 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. 

Updated: Apr 29, 2021, 01:40 PM IST
कोरोनाच्या हाहाकारामुळे चार धाम यात्रांबाबत सरकारचा मोठा निर्णय title=

डेहराडून : कोरोना संसर्गाचे थैमान देशभरात सुरू आहे. रोज 3 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे.  यापार्श्वभूमीवर पुढच्या महिन्यात सुरू होणारी चार धाम यात्रा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठरलेल्या वेळेत धामांचे कपाट उघडतील

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी गुरूवारी डेहरादून येथे पत्रकारांशी संवाद साधला. 'कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चारधाम तिर्थ यात्रा करणे शक्य नाही. त्यामुळे यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हिमालयीन तिर्थक्षेत्रांचे कपाट ठरलेल्या तारखेनुसार उघडतील. पुरोहित वर्ग नियमित पूजा करतील', असे रावत यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडात कोरोनाचं संकट

देशातील इतर राज्यांप्रमाणे उत्तराखंडमध्ये कोरोना संसर्गाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या 24 तासात उत्तराखंडमध्ये 6 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले आहे.

तिर्थक्षेत्रांचे कपाट कधी उघडतील 

14 मे रोजी अक्षय तृतीयाच्या पवित्र दिवशी उत्तर काशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे कपाट उघडले जातील. तसेच रुद्र प्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ मंदिराचे कपाट 17 मे रोजी तर, बद्रीनाथ मंदिराचे कपाट 18 मे रोजी उघडण्यात येणार आहे.