मोठी बातमी: दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; ICU कक्षात उपचार सुरु

सत्येंद्र जैन यांना श्वसनाचा खूप त्रास जाणवत होता. यासाठी त्यांचे CT Scan करण्यात आले. तेव्हा जैन यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले.

Updated: Jun 19, 2020, 06:26 PM IST
मोठी बातमी: दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; ICU कक्षात उपचार सुरु title=

नवी दिल्ली: कोरोनाची लागण झालेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांचा फुफ्फुसांना संसर्ग झाला. त्यामुळे सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. यानंतर त्यांना साकेत येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी स्मार्ट रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याठिकाणी अतिदक्षता विभागात (ICU) सत्येंद्र जैन यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना श्वसनाचा खूप त्रास जाणवत होता. यासाठी त्यांचे CT Scan करण्यात आले. तेव्हा जैन यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्यांची प्रकृती काहीशी गंभीर आहे. 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केजरीवाल यांनी म्हटले की, जैन यांच्या फुफ्फुसातील न्यूमोनियाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. जैन यांना श्वसनाचा त्रास आणि थकवा जाणवत आहे. आम्ही सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. 

कोरोना : आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत, एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या

जैन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना बराच ताप होता. तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाले आहे. दरम्यान, 'आप'च्या आमदार आतिषी, दिल्ली सरकारच्या सल्लागार अभिनंदिता माथूर आणि आपचे प्रसारमाध्यम पॅनेलिस्ट अक्षय मराठे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, त्यांच्यात COVID 19 ची लक्षणे अत्यंत सौम्य असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी खोकला आणि ताप आल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. सुदैवाने ही टेस्ट नेगेटिव्ह आली होती. दरम्यान, दिल्लीत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत.