Crime News In Marathi: पश्चिम बंगालच्या हुगली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 8 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या घडवून आणली आहे. मुलाचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला होता. मुलाच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. तसंच, त्याच्या हाताचे मनगट कापल्याचेही समोर आले आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. मात्र, चार दिवसांनंतर झालेल्या खुलाशानंतर सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले होते.
मुलाच्या मृत्यूनंतर आई धाय मोकलून रडत होती. तिला दिलासा देण्यासाठी आजूबाजूचे लोक व नातेवाईक तिची समजूत घालण्यासाठी आले होते. मात्र, चारच दिवसात लेकासाठी रडणाऱ्या या आईचे खरे रुप समोर आले आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आई स्वतःच रडण्याचे व दुःखी होण्याचे नाटक करत आहे. आईनेच आपल्या पोटच्या लेकाची हत्या का केली याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
हुगली जिल्ह्यातील कोन्नगर परिसरातील हे प्रकरण आहे. शुक्रवारी पोलिसांना आठ वर्षांच्या स्नेहांग्शु शर्मा याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी चार दिवसांनी मुलाची आई शांता शर्मा आणि तिची लेस्बियन पार्टनर इशरत परवीनला अटक केली आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, आरोपी शांता शर्मा आणि इशरत परवीन यांना कोलकत्त्यातील वाटगंज येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी त्यांच्यातील संबंध कबुल केले आहे. मुलगा स्नेहांग्शुने दोघींना आपत्तीजनक स्थितीत पाहिले होते. त्यामुळं त्यांना भीती होती की त्यांच्यातील संबंध तो इतरांना सांगेन आणि आपण लेस्बियन आहोत हे सत्य सगळ्यांसमोर येईल. या भितीपोटीच त्यांनी पोटच्या लेकाच्या हत्येचा कट रचला.
कोलकात्तापासून 25 किमी दूर असलेल्या कोन्नगरच्या आदर्शनगरमध्ये त्याची हत्या करण्यात आली. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या स्नेहांशूवर चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्या डोक्यात लोखंडाने वार करण्यात आले होते. तर, दगडाने त्याचा चेहरा ठेचण्यात आला होत. त्याचे हातदेखील कापण्यात आले होते. मुलाचा मृतदेह पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्याच्याच आईने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
ईशरत आणि शांता यांचे लग्नाच्या आधीपासून संबंध होते. ईशरतनेच चिमुरड्याला ठार केले. तर, गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकूदेखील इशरतने आणला होता. ईशरत आणि शांता या दोन्ही मध्यरात्री फोनवर बोलत असायच्या. इतकंच नव्हे तर, शांताच्या पतीलाही त्यांच्यातील संबंधांबाबत कल्पना होती.
शांताच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, ती रात्र-रात्र ईशरतसोबत फोनवर बोलत राहायची. त्या दोघींच्या हावभावावरुन मला अनेकदा संशय यायचा. एक दिवस मी त्या दोघींनी संबंध ठेवताना पाहिले होते. तेव्हा माझा संशय खरा ठरला. मात्र मी याची माहिती कोणालाच दिली नाही. शांताला देखील जाणवू दिले नाही. तिची समाजात बदनामी होऊ नये म्हणून मी शांत राहिलो. तसंच, मुलाच्या पुढच्या भविष्याची चिंतादेखील होती. मात्र, सगळेच संपले.