माकडाच्या निधनानंतर दशक्रियेच्या जेवणासाठी गावजेवण; भर कोरोनात 50 हजार लोकांची उपस्थिती

मध्यप्रदेशातील राजगडमध्ये एका माकडाच्या निधनानंतर त्याचा अंत्यविधी आणि दशक्रीया विधीचा कार्यक्रम करण्यात आला. ही घटना डालुपूरा गावात घडली आहे. सोमवारी या गावात दशक्रीयेच्या जेवणासाठी 50 किलोमीटरहून लोकं आले होते

Updated: Jan 11, 2022, 02:39 PM IST
माकडाच्या निधनानंतर दशक्रियेच्या जेवणासाठी गावजेवण; भर कोरोनात 50 हजार लोकांची उपस्थिती title=

भोपाल : मध्यप्रदेशातील राजगडमध्ये एका माकडाच्या निधनानंतर त्याचा अंत्यविधी आणि दशक्रीया विधीचा कार्यक्रम करण्यात आला. ही घटना डालुपूरा गावात घडली आहे. सोमवारी या गावात दशक्रीयेच्या जेवणासाठी 50 किलोमीटरहून लोकं आले होते. माकडाच्या निधनामुळे दुःखी झालेल्या गावकऱ्यांनी निधी गोळा करून अंत्यविधी, अस्थिविसर्जन, दशक्रीया विधी आणि जेवणाचे आयोजन केले होते. याकरीता कार्ड देखील छापण्यात आले होते. 

माकडाचे अंतिमसंस्कार हिंदू रितीरिवाजाप्रमाणे बँड वेगैरे लावून करण्यात आले. तिसऱ्या दिवशी अस्थिंचे विसर्जन उज्जेन येथे करण्यात आले. गावातील हरी सिंह यांनी माकडाच्या निधनामुळे मुंडन केले. त्यानंतर माकडाच्या निधनानंतर दहाव्याचा कार्यक्रम देखील करण्यात आला. गावकऱ्यांचे म्हणणे होते की, माकड श्री हनुमानाचा अवतार होते. 

दशक्रीयेच्या जेवणासाठी गर्दी

सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू झाले आहेत. राजधानी दिल्लीत खासगी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. 

अशातच मध्यप्रदेशात एका माकडाच्या निधनानंतर पाच हजार लोकांना दहाव्याचे गावजेवण आयोजित करण्यात आले. यामुळे परिसरात कोरोनाचा धोका वाढला आहे.

माकडाचे निधन कसे झाले?

29 डिसेंबर रोजी माकडाचे निधन झाले होते. त्या दिवशी सकाळीच जंगलातून माकड गावात आले होते. दिवसभर गावभर हिंडल्यानंतर रात्री 8 वाजता थंडीत कुडकूडत एका घरासमोर येऊन बसला. ते पाहून लोकांनी माकडासाठी शेकोटी केली. ऊबदार कपडे घातले. परंतू तरी देखील माकडाची तब्बेत बिघडली. जवळच्या ग्रामिण रुग्णालयात माकडाला नेण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

बॅड मिरवणूकीसह अंतिम यात्रा

30 डिसेंबरला संपूर्ण गाव हनुमान मंदिर पोहचले. तेथून माकडाच्या अंतिम यात्रेस सुरूवात झाली. हिंदू रिती प्रमाणे माकडाच्या देहावर अंतिमसंस्कार करण्यात आले.