नवी दिल्ली: राफेल विमानांच्या व्यवहारात आमच्या कंपनीने स्वत:हून रिलायन्सला ऑफसेट भागीदार म्हणून निवडले. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसून हा संपूर्ण व्यवहार पारदर्शक असल्याची स्पष्टोक्ती दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिली.
राफेल विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी लावून धरला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारला राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेचा तपशील न्यायालयात सादर करावा लागला.
या पार्श्वभूमीवर दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी मंगळवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले.
ऑफसेट पार्टनर म्हणून रिलायन्सची निवड दसॉल्टने स्वत: केली होती. याशिवाय, आम्ही भारतातील अन्य ३० कंपन्यांशीही करार केले आहेत. यापूर्वी मी दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे. मी खोटं बोलत नाही. तशी माझी ख्याती नाही. सीईओच्या पदावर असताना मला तसे करता येणे शक्यही नाही, असे ट्रॅपियर यांनी सांगितले.
राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. हे सर्व आरोप एरिक ट्रॅपियर यांनी फेटाळून लावले.
या खरेदी व्यवहारात कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पण जर दसॉल्टने फ्रेंच कायदा मोडला असता, तर फ्रान्समध्ये तात्काळ कारवाई झाली असती असे ट्रॅपियर यांनी सांगितले.