केंद्रीय मंत्र्यांच्या भावाचा ICU मध्ये तडफडून मृत्यू; डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई

Heart Attack : केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या भावाला शुक्रवारी हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला

Updated: Jan 28, 2023, 11:23 AM IST
केंद्रीय मंत्र्यांच्या भावाचा ICU मध्ये तडफडून मृत्यू; डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई title=
(फोटो सौजन्य - PTI)

Bihar News : केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे (ashwini choubey) यांचे भाऊ निर्मल चौबे यांचे शुक्रवारी भागलपूर (bhagalpur) येथील रुग्णालयात निधन झाले. भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात निर्मल चौबे यांचे निधन झाले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत मोठा गोंधळ घातला. याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. निर्मल चौबे यांना हृदयविकाराच्या झटका (heart attack) आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. त्यानंतर चौबे कुटुंबिय मृतदेह घरी घेऊन गेले.

रूग्णाची प्रकृती गंभीर होती. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले होते. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. आवश्यक औषधेही देण्यात आली. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले, मात्र तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. या कारणावरून मी दोन डॉक्टरांना निलंबित केले आहे, असे रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. असीम दास यांनी सांगितले. नातेवाईक रुग्णालयावर आरोप करत आहेत, मात्र याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने यावर कायदेशीर कारवाई करता येत नाही, असेही असीम दास म्हणाले.

"घरी दुपारी ४ वाजता वडिलांना छातीत दुखू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना तात्काळ डॉक्टर एमएन झा यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टर सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांनी निर्मल चौबे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्यांना आयसीयूमध्ये हलवले. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. बीपी मशीन म्हणजे काय हे अटेंडंटलाही माहीत नव्हते. यादरम्यान वडिलांची प्रकृती ढासळत गेली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला," निर्मल चौबे यांचा मुलगा नितेश चौबे यांनी सांगितले.

पोलिसांनी काय सांगितलं?

याप्रकरणी तक्रार नोंदवल्यावरच तपास करू. ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जर पीडितेच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयात गोंधळ घातला आणि डॉक्टर पळून गेले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे पोलीस उपअधीक्षक अजय कुमार चौधरी म्हणाले.