लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, गांधी घराण्याचे निकटवर्तीय भाजपमध्ये

'पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे मी दु:खी आहे. काँग्रेस पुलवामा हल्ल्याचंही राजकारण करत आहे'

Updated: Mar 14, 2019, 02:08 PM IST
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, गांधी घराण्याचे निकटवर्तीय भाजपमध्ये  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वी काँग्रेसला आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा झटका बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टॉम वडक्कन गुरुवारी भाजपामध्ये दाखल झालेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपामध्ये वडक्कन यांचं स्वागत केलंय. त्यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली. उल्लेखनीय म्हणजे, टॉम वडक्कन हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जात होते. इतकंच नाही तर ते काँग्रेच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे स्वीयसचिव म्हणून कामही केलंय. टॉम वडक्कन यांनी माजी पंतप्रधान आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांचे सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं होतं.

टॉम वडक्कन केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून येतात. दीर्घकाळापासून ते काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही काम केलंय. 'काँग्रेसमध्ये वंशपरंपरेचं राजकारण फोफावतंय. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे मी दु:खी आहे. काँग्रेस पुलवामा हल्ल्याचंही राजकारण करत आहे. त्यामुळे मी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहे' असं वडक्कन यांनी यावेळी म्हटलंय. 

जेव्हा तुम्ही देशाच्या सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता तेव्हा दु:ख होतं. काँग्रेस सोडणं आणि भाजपामध्ये सामील होणं हा विचारसरणीचा नाही तर देशप्रेमाचा प्रश्न आहे. 

दुसरीकडे, महाराष्ट्रातही विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या - सुजय विखे पाटील यांच्या रुपाने काँग्रेसला मोठा धक्का सहन करावा लागलाय. सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय.