दिल्लीच्या साकेत कोर्टात गोळीबाराचा थरार, वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीची महिलेवर फायरिंग

दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीने महिलेवर चार राऊंड फायर केले. अचानक घडलेल्या घटनेने कोर्टात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Updated: Apr 21, 2023, 01:54 PM IST
दिल्लीच्या साकेत कोर्टात गोळीबाराचा थरार, वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या आरोपीची महिलेवर फायरिंग title=

Delhi Crime : दिल्लीच्या साकेत कोर्टात (Saket Court) आज गोळीबाराचा थरार रंगला. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात हलवण्यात आलंय. हल्लेखोर वकिलाच्या ड्रेसमध्ये आला होता. त्यानं 3 ते 4 राऊंड फायरींग केलीय (Saket Court Firing). जुन्या वादावरून हल्लेखोरानं महिलेवर गोळीबार केल्याचं बोललं जातंय. भर दिवसा गोळीबार झाल्याने कोर्टात एकच खळबळ उडाली. कोर्टात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, तसंच मेटल डिटेक्टरही बसवण्यात आलं आहे. इतकी सुरक्षा असतानाही आरोपी बंदूक घेऊन कोर्टात शिरला कसा, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एका प्रकरणात ही महिला कोर्टात आली होती.

भर कोर्ट परिसरात गोळीबार
आरोपीचं नाव कामेश्वर प्रसाद सिंह उर्फ बिनोद सिंह असल्याचं समोर आलं असून तो वकील होता. बार काऊंसिलने त्याला निलंबित केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने महिलेला 25 लाख रुपये दिले होते. पण ती महिला पैसे परत करत नव्हती. 

चार राऊंड केले फायर
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने महिलेवर चार राऊंड फायर केले. यात तिच्या पोटातही गोळी लागली. दिल्ली पोलिसांनी तात्काळ महिलेला जीपमध्ये टाकून एम्स रुग्णालयात दाखल केलं. महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. आरोपी आणि जखमी महिले एकमेकांना ओळखत असून आर्थिक गोष्टीवरुन जुना वाद असल्याचं बोललं जातंय.

दिल्ली पोलिसांची प्रतिक्रिया
या घटनेवर दिल्ली पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली साकेत कोर्टात सकाळी साडेदहा वाजता फायरिंगची घटना घडली. महिलेचं नाव एम राधा असं असून तीचं वय 40 आहे. महिलेच्या पोटात दोन तर हातात एक गोळी लागली आहे. जखमी महिलेला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने महिलेवर चार-पाच राऊंड फायर केले. त्यानंतर तो कँटिनच्या मागे असलेल्या गेटने फरार झाला. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं तैनात करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री केजरीवालांची टीका
दिल्लीत भर दिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी उपराज्यपालांवर टीका केली आहे. दिल्लीतील कायदा आणि सुरक्षा पुरती कोलमडली असून प्रत्येक गोष्टी राजकारण केलं जात आहे. लोकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. परिस्थिती आटोक्यात आणता येत नसेल तर पदाचा राजीनामा द्यावा असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.