Delhi Mayor Election 2023 : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा, भाजप-आपचे नगरसेवक भिडले

Delhi Mayor Election 2023 Latest : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा पाहायला मिळाला. स्टँडिंग कमिटी सदस्य निवडीवरुन भाजप-आपचे नगरसेवक भिडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. मतदानावेळी गोंधळ झाल्याचा भाजपने आरोप केला आहे. मात्र, भाजपला पराभव पचत नसून तेच राडा घालत आहेत, असा आरोप 'आप'ने (AAP) केला आहे.

Updated: Feb 23, 2023, 09:20 AM IST
Delhi Mayor Election 2023 : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा, भाजप-आपचे नगरसेवक भिडले title=

Delhi Mayor Election 2023: Delhi MCD च्या स्थायी समितीच्या निवडणुकीत दिल्ली महानगरपालिकेत गदारोळ झाला आहे. भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. याच्या निषेधार्थ आपच्या नगरसेवकांनी आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, प्रदीर्घ संघर्षानंतर, आम आदमी पार्टी (AAP)अखेर दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. आपच्या उमेदवार शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर बनल्या आहेत. बुधवारी सायंकाळी झालेल्या निवडणुकीत त्यांना 150 मते मिळाली, तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना केवळ 116 मते मिळाली. निवडणुकीत एकूण 266 मतदार होते. मात्र, महापालिकेच्या स्थायी सदस्यांच्या निवडीबाबत सभागृहात अद्यापही गदारोळ झाला. दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचवेळी आपच्या नगरसेवकांनी निवडणूक होईपर्यंत सभागृह सोडण्यास नकार दिला आहे. 

 नगरसेवकांनी एकमेकांवर बाटल्या फेकल्या आणि धक्काबुक्की

दिल्ली महानगरपालिकेत रात्री तुफान गोंधळ झाला. मध्यरात्री 2 नंतरही हा गदारोळ सुरु होता. बुधवारी महापौर उपमहापौर यांच्या निवडणुकीनंतर हा हंगामा सुरु झाला. गोंधळानंतर अनेक नगरसेवक सभागृहातच झोपले. आपचे नगरसेवक संजय सिंह यांनी रात्री 1 वाजल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपवर गोंधळाचे गंभीर आरोप केले. नगरसेवकांनी एकमेकांवर बाटल्या फेकल्या आणि धक्काबुक्की केली. एमसीडीत असा गोंधळ याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. अराजकता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आपचे नगरसेवक संजय सिंह यांनी केला.  

'आप'ने महापौर-उपमहापौरपद काबीज केले

बुधवारी झालेल्या मतदानात दिल्लीतील भाजपच्या सातही खासदारांनी मतदान केले. त्याचवेळी आपचे खासदार संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एनडी गुप्ता यांनीही मतदान केले. आप आमदार आतिशी मार्लेना आणि दुर्गेश पाठक यांनीही मतदान केले. त्याचवेळी उपमहापौरपदही 'आप'ने (AAP) काबीज केले. आम आदमी पक्षाचे आले इक्बाल यांना 147 तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे कमल बागडी यांना 116 मते मिळाली. तर 2 मते अवैध ठरली.

भाजपचे निवेदन जारी 

पराभवानंतर भाजपच्या दिल्ली युनिटने एक निवेदन जारी करुन हा नैतिक विजय असल्याचे म्हटले आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी सांगितले की, महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी क्रॉस व्होटिंग केले. आम आदमी पक्षाकडे सभागृहात स्वतःची 150 मते होती. यासोबतच 2 अपक्ष आणि 1 काँग्रेस नगरसेवकाने आम आदमी पार्टीला पाठिंबा जाहीर केला होता. म्हणजेच त्यांना एकूण 153 मते मिळायला हवी होती, मात्र मतदानात त्यांना महापौरपदासाठी केवळ 150 आणि उपमहापौरपदासाठी केवळ 147 मते मिळाली. याचा अर्थ भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. 

स्थायी समितीच्या निवडणुकीवरुन गदारोळ

या दोघांवर झालेल्या निवडणुकीनंतर एमसीडीच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीची वेळ आली तेव्हा गदारोळ सुरु झाला. प्रचंड गदारोळामुळे एमसीडी सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले. महापौर डॉ. शेली ओबेरॉय आपल्या जागेवरून उठल्या. मात्र, रात्रभर जावो की उद्या सकाळ, स्थायी समिती सदस्य निवडून आल्यानंतर तिथेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आप नगरसेवकांचा विरोध

दुसरीकडे, आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणतात की भाजप नगरसेवक निवडणुका होऊ नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्ट उल्लंघन आहे. निवडणुका घेऊनच आम्ही उठू. रात्री असो वा दुसऱ्या दिवशी सकाळी. भाजपला बळजबरीने स्थायी समितीच्या सदस्याची फेरनिवड हवी आहे. ही प्रक्रिया अशी संपणार नाही. मात्र आज या सभागृहाच्या बैठकीत निश्चितपणे निवडणूक होणार आहे.