Pitbull Attack : गार्डनमध्ये खेळणाऱ्या चिमुरड्यावर पिटबूलचा हल्ला, चेहऱ्यावर 150 टाके

पिटबूल कुत्र्याच्या हल्ल्याची आणखी एक घटना, हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी

Updated: Sep 8, 2022, 09:45 PM IST
Pitbull Attack : गार्डनमध्ये खेळणाऱ्या चिमुरड्यावर पिटबूलचा हल्ला, चेहऱ्यावर 150 टाके  title=
संग्रहित फोटो

Pitbull Dog Attack : लखनऊमध्ये (Lucknow) पिटबूल (Pitbull) जातीच्या कुत्र्याने आपल्याच मालकीणीवर हल्ला केला होता. यात 80 वर्षांच्या मालकिणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाचा आता पिटबूल कुत्र्याच्या दहशतीची आणखी एक घटना समोर आली आहे. सर्वात आक्रमक आणि शक्तीशाली कुत्र्यांमध्ये पिटबूल जातीच्या कुत्र्याचा समावेश होतो. दिल्लीजवळच्या (Delhi) गाजियाबादमधली (Gazhiabad) ही ताजी घटना असून इथल्या संजय नगर परिसरात रहाणाऱ्या एका 11 वर्षांच्या मुलावर पिटबूल कुत्र्याने हल्ला केला.

पुष्प त्यागी असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर पिटबूल कुत्र्याने हल्ला केला. ही घटना 3 सप्टेंबरची असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर 150 टाके घालण्यात आले आहेत.

3 सप्टेंबरला पुष्प घराजवळच्या गार्डनमध्ये खेळत होता. त्यावेळी एक मुलगी पिटबूल कुत्र्याला घेऊन गार्डनमध्ये फिरण्यासाठी आली होती. अचानक तो कुत्रा हिंसक झाला आणि मुलीच्या हाताला हिसका देऊन तो खेळत असलेल्या मुलाच्या अंगावर धावून गेला. कुत्र्याने मुलाचा चेहरा आणि कानावर हल्ला केला. ही घटना पहाताच तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्या मुलाला कुत्र्याच्या तावडीतून कसंबसं सोडवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मुलाची गंभीर स्थिती पहाता लोकांनी त्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या घटनेवर मुलाच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.

गाजियाबाद नगर निगमने कुत्र्याच्या मालकावर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. संजय नगर मध्ये रहाणाऱ्या सुभाष त्यागी या व्यक्तीने पिटबूल कुत्र्याचं रजिस्ट्रेशन न करताच त्याला घरात ठेवलं असल्याचं समोर आलं आहे. 

लिफ्टमध्ये कुत्र्याचा मुलावर हल्ला
दोन दिवसांपूर्वीच गाजियाबादमध्येच एक प्रकरण समोर आलं होतं. लिफ्टमध्ये एका पाळिव कुत्र्याने चिमुरड्याचा चावा घेतला होता. या प्रकरणी मुलाच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर कुत्र्याच्या मालकिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.