#NirbhayaCase : त्यांना फाशी तर द्यावीच लागेल; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

निर्भयाच्या आईची पहिली प्रतिक्रिया 

Updated: Mar 2, 2020, 06:05 PM IST
#NirbhayaCase : त्यांना फाशी तर द्यावीच लागेल; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया   title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : निर्भया NIRBHAYA सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्च रोजी फाशी होणं अपेक्षित होतं. पण, आता मात्र याप्रकरणी दोषींची फाशी तूर्तास टळली असल्याचं वृत्त समोर आलं. पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती देण्याचा निर्णय पटियाला हाऊस कोर्टाकडून घेण्यात आला. याच निर्णय़ावर निर्भयाच्या आईने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

माध्यमांशी संवाद् साधतेवेळी प्रतिक्षेच्या परिसीमेचा बांध फुटलेल्या निर्भयाच्या आईने हे न्यायव्यवस्थेचं अपयश असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली. 'दोषींना फाशी देण्यासाठी न्यायालयाकडून इतका वेळ का दवडला जात आहे? वारंवार फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळणं हे आपल्या न्यायव्यवस्थेचं अपयश आहे. आपली न्यायव्यवस्थाच दोषींचं समर्थन करत आहे', अशा शब्दांत निर्भयाच्या आई आशा देवी यांच्याकडून या प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला. 

निर्भयावर झालेले अत्याचार आणि देशाच्या अनेक भागांमध्ये महिलांवर होणारे अमानवी अत्याचार पाहता सर्वजण हा कसला तमाशा पाहत आहेत, शिक्षेला इतका वेळ का लागत आहे असाच प्रश्न त्यांनी वारंवार उपस्थित केला. निर्भयाच्या आईने दिलेली ही प्रतिक्रिया आणि या प्रकरणी सुनावण्यात आलेला नवा निर्णय पाहता देशभरातून अनेकांनीच न्यायव्यवस्थेच्या कार्यप्रणालीवर निराशेचा सूर आळवला आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्याकडे अद्यापही निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी असणाऱ्या पवनची याचिका अद्यापही प्रलंबित असल्यामुळे सलग तिसऱ्यांदा दोषींना फाशीची शिक्षा देण्यास दिरंगाई होत आहे. तेव्हा आता याप्रकरणी पुढील सुनावणीमध्ये ५ मार्चला काय होणार याकडेच साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं असेल.