Crime News: असं म्हणतात की चोरही चोरी करताना आपली काही मूल्यं पाळतात. आता ते कितपत खऱं किंवा खोटं आहे हे तपासाचा भाग आहे. पण दिल्लीमधील एक घटना मात्र याचा प्रत्यय देताना दिसत आहे. झालं असं की, एक जोडपं घराबाहेर फिरत असताना त्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला होता. पण जोडप्याकडे फक्त 20 रुपये होते. चोरांनी पुन्हा त्याची तपासणी केली तरी काहीच हाती लागलं नाही. शेवटी त्यांनीच जोडप्याला 100 रुपये दिले आणि फरार झाले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी 200 हून अधिक सीसीसीटीव्ही फुटेज तपासलं. अखेर 'दयाळू चोर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
21 जूनला शाहदराच्या फर्श बाजारात रात्री 10 वाजून 55 मिनिटांनी एक फोन आला होता. 2 चोर बंदुकीचा धाक दाखवत एका जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. चोर लुटण्याचा प्रयत्न करत असताना तिथेच जवळच्या इमारतीत राहणारी एक व्यक्ती मोबाइलमध्ये सगळी घटना रेकॉर्ड करत होती. व्हिडीओत दुचाकीवरुन आलेले दोघे शस्त्राचा धाक दाखवत दांपत्याला लूटत असल्याचं दिसत होतं.
या घटनेनंतर पोलिसांना अनेक फोन आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पीडित दांपत्याने पोलिसांना सांगितलं की, 2 लोकांनी आम्हाला लुटण्याचा प्रयत्न केला. बंदुकीचा धाक दाखवत आम्हाला थांबवलं आणि शोध घेतला. आमच्याकडे फक्त 20 रुपये सापडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आमची झडती घेतली. आमच्याकडे काहीच सापडलं नाही तेव्हा आम्हाला 100 रुपये देऊन ते पळून गेले. दांपत्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दिल्ली पोलिसांच्या शाहदरामधील ऑपरेशन युनिट टीमने आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पोलिसांनी दांपत्याला लुटण्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणापासून ते परिसरात लागलेल्या एकूण 200 सीसीटीव्हींचं फुटेज तपासलं. यानतर पोलीस दिल्लीच्या जगतपुरी परिसरापर्यंत पोहोचले होते.
पोलिसांनी जगतपुरीत राहणाऱ्या 100 हून अधिक लोकांची कागदपत्रं तपासली. तसंच आपल्या खबरींनाही सूचना दिली होती. पोलिसांना आरोपी हर्ष राजपूत याच्याबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांच्या पथकाला वेलकम पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात याच चोरांनी सोनसाखळी चोरल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी हर्षचा साथीदार देव वर्मा याला बुराडी संतनगर येथून अटक केली.