मुंबई : व्यसन ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होते. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं असतील. व्यसन कोणतंही असो तो व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतोच. अनेक जण मग गुन्हेगारीच्या मार्गावर जातात. नशा करण्यासाठी लोकं वेगवेगळ्या गोष्टी वापरतात. रंग, कफ सिरप, पेट्रोल, टायर ट्यूब, नेलपॉलिश यांचाही नशा करण्यासाठी वापर केला जातो.
नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे. जी ऐकूण तुम्हाला ही धक्का बसेल. पश्चिम बंगालमधील तरुण कंडोमच्या नशेच्या आहारी जात आहेत. कंडोमची विक्री अचानक वाढल्याने बाजारातून कंडोम संपले आहेत.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील तरुणांना कंडोमचे व्यसन लागले आहे. फ्लेवर्ड कंडोम घेऊन ते गरम पाण्यात तासभर भिजत ठेवतात. एक तासानंतर, ते पाणी पितात, ज्याची नशा सुमारे 10 ते 12 तास टिकते.
दुर्गापूरमध्ये अनेक विद्यार्थी राहतात जे घरापासून दूर वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहून त्यांना सिगारेट, दारू अशा अनेक प्रकारच्या नशेचे व्यसन जडले आहे. अल्कोहोल आणि इतर नशा कंडोमपेक्षा खूप महाग आहेत. त्यामुळे तरुण या मार्गावर जाताना दिसत आहेत.
आजतकने दिलेल्या बातमीनुसार, फ्लेवर्ड कंडोमचा वापर नशा म्हणून केला जात आहे, असा खुलासा एका विद्यार्थ्याने केला आहे. एका दुकानदाराने विद्यार्थ्याला याबद्दल विचारले. जेव्हा दुकानदाराने त्याच्या नियमित ग्राहकाला विचारले की तो दररोज कंडोम का घेऊन जातो, तेव्हा त्याने सांगितले की तो नशा करण्यासाठी दररोज कंडोम खरेदी करतो.
पण हे जीवासाठी धोकादायक ठरु शकतात. ज्यामुळे आता प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. ही गोष्ट रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.