नवी दिल्ली : भाजप मला घाबरतं आहे त्यामुळे मला या प्रकरणात गोवलं जातं आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंग आणि फडणवीसांना दिग्विजय सिंहांनी आव्हान दिलं आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या पत्रांमध्ये दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर मिळाला आहे.
काँम्रेड प्रकाश याने सुरेंद्र गडलिंगला पाठविलेल्या एका पत्रातील मोबाईल क्रमांक हा दिग्विजय सिंह यांचा असल्याचे उघड झाले आहे. तसेच, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या आणखी एका पत्रात, काँग्रेसचे काही नेते मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
मिलिंद तेलतुंबडेनं रोना विल्सनला हे पत्र पाठवले आहे. त्यामुळं नक्षलवाद्यांना मदत करण्यास तयार असलेले काँग्रेस नेते म्हणजे दिग्विजयसिंह हेच आहेत का? याचा तपास पुणे पोलीसांकडून केला जाणार आहे. नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परीषदेच्या माध्यमातून कोरेगाव भिमा येथील दंगलीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन अटक केलेल्या आरोपींच्या पत्रव्यवहारात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल क्रमांक आढळला आहे.
पुणे पोलिसांनी टेलिकॉम कंपन्यांकडून त्याची खातरजमा देखील केली आहे. या सर्व घडामोडींमुळं दिग्विजयसिंह यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत हे निश्चित.