मुंबई : 'नजर हटी, दुर्घटना घटी' हे केवळ रस्ते अपघातांच्या बाबतीत लागू होतं असं नाही. अगदी तुमच्या मोबाईल स्मार्ट फोनमध्ये देखील असं घडू शकतं. तुमच्या निष्काळजीपणामुळं स्मार्ट फोनमधून तुमच्या बँक खात्यातले लाखो रुपये गायब होऊ शकतात. (do not download fake mobile app in your smart phone otherise you lost your money)
सध्याचा डिजीटलचा जमाना आहे. आपण स्मार्ट मोबाईल वापरतो. मोबाईल स्मार्ट असण्यासह आपणही स्मार्ट असणं गरजेचं आहे. कारण चोरटे देखील स्मार्ट झाले आहेत. हे चोरटे अगदी चाकू, तलवार घेऊन लुटमार करत नाहीत. तर थेट ऑनलाईन स्मार्ट पद्धतीने आपल्याद्वारेच आपल्या रक्कमेवर डल्ला मारतात.
सध्या स्मार्ट फोनद्वारे विविध प्रकारच्या बिलाचा भरणा केला जातचो. यासाठी यूपीआय पेमेंट अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र डिजीटल पेमेंट करताना सावध रहा, नाहीतर तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या पैशांवर पाणी सोडावं लागेल.
गंडा घालण्यासाठी सायबर चोर वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्ज देण्याच्या नावाखाली बोगस अॅप्लिकेशन लाँच करण्यात आली.
कमी व्याजदरात कर्ज देण्याचं आमीष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जातेय. अशा फ्रॉड, बोगस अॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा सायबर दोस्त या गृह मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आला आहे.
काय काळजी घ्याल?
नीट खातरजमा केल्याशिवाय मोबाइलमध्ये कोणतंही मोबाइल अॅप डाउनलोड करू नका. कर्ज देणाऱ्या कंपन्यांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरून घ्या. कोणतंही कर्ज देणारं अॅप डाऊनलोड करताना काळजी घ्या. कागदपत्रं अपलोड करताना, पेमेंट करताना संबंधित वेबसाईटची URL तपासून घ्या, असं आवाहन या ट्विटर हँडलद्वारे करण्यात आलंय.
एवढंच नाही तर सायबर गुन्हेगार चक्क पोलिसांच्या नावानं बोगस पॉप अप लिंक पाठवत असल्याचंही आढळलंय. अश्लील मजकुरामुळं तुमचा मोबाईल किंवा संगणक ब्लॉक करण्यात येतोय.
तो अनब्लॉक करण्यासाठी दंड भरा, असे पॉप अप मेसेज पाठवले जातात. असे पॉप अप मेसेज क्लिक करणं टाळा, असा सल्लाही सरकारकडून देण्यात आलाय. त्यामुळे सावध रहा सतर्क रहा.
दरम्यान, स्पॅम कॉलच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचे प्रकारही वाढलेत. सर्वाधिक स्पॅम कॉलच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती समोर आली आहे.
यंदाच्या वर्षी भारतात 202 मिलियन स्पॅम कॉल्स (Spam Call) करण्यात आले आहेत. याचाच अर्थ एका फोन नंबरवरून दिवसाला 6 लाख 64 हजार स्पॅम कॉल करण्यात आले.
म्हणजेच प्रत्येक तासाला तब्बल 27 हजार स्पॅम कॉल करून लोकांना त्रास देण्यात आला, अशी धक्कादायक आकडेवारी ट्रकॉलर कंपनीनं जाहीर केली आहे.
यापैकी बहुतांशी कॉल बँक खाते KYC आणि OTP शी संबंधित असल्याचं अहवालात म्हटलंय. तुम्ही या कॉलर्सना OTP नंबर शेअर केला तर तुम्हाला आर्थिक फटका बसलाच म्हणून समजा. तेव्हा सावध व्हा, केवळ स्मार्टफोन वापरू नका. तर खरोखर स्मार्ट व्हा.