त्या फेअरनेस क्रिमसाठी डॉक्टरांची परवानगी लागणार

फेअरनेस क्रिमच्या वापरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध आणले आहेत.

Updated: Apr 11, 2018, 06:03 PM IST
त्या फेअरनेस क्रिमसाठी डॉक्टरांची परवानगी लागणार title=

नवी दिल्ली : फेअरनेस क्रिमच्या वापरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध आणले आहेत. स्टेरॉईड आणि शेड्यूल एचमध्ये असलेली फेअरनेस क्रिम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे. केमिस्टनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी फेअरनेस क्रिम विकली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

१४ फेअरनेस क्रिमवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकतीच १४ फेअरनेस क्रिमवर बंदी घातली आहे. स्टेरॉईड आणि शेड्यूल एचमध्ये असल्यामुळे या क्रिमवर बंदी घालण्यात आली. यासाठी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स नियम १९४५मध्ये बदलही करण्यात आले. नेहमीची फेअरनेस क्रिम विकत घेण्यासाठी मात्र कोणतेही नवीन नियम करण्यात आलेले नाहीत.

या क्रिमवर बंदी

अलक्लोमेटासोन, बेक्लोमेटासोन, फ्लुसिनोनाईड, हेलोबेटासोन, मेथीलप्रेडिनसोन, प्रिडिनकारबेट आणि ट्रायनसिनोलोन अॅसिटोनाईड यांच्यासारख्या फेअरनेस क्रिमवर सरकारनं बंदी घातली आहे. ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायजरी बोर्डाबरोबर सल्लामसलत करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. काही फेअरनेस क्रिमवर बंदी घालावी तर काही फेअरनेस क्रिम विकत घेताना डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करावं, अशी मागणी बोर्डानं केली होती.