मुंबई : तुम्ही रस्त्यावरून गाडीने जात असताना अनेकदा कुत्र्याने पाठलाग केल्याचं अनुभवलं असेल. अनेकदा कुत्रा मागे लागल्याने गाडीचा वेग वाढवल्याने अपघात होतात. ठराविक अंतरावर गेल्यानंतर कुत्रे पाठलाग थांबवतात. कुत्र्याचं तुमच्याशी काही वैरही नसतं पण कुत्रे मागे का धावतात? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. यामागे काही कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा एक ठराविक परिसर असतो. त्यामुळे स्वत:साठी नेमलेल्या हद्दीबाहेर शक्यतो कुत्रे जात नाही. सीमा निश्चित करण्यासाठी कुत्रे झाडं, भिंती, खांबे, गाड्या यावर मूत्रविसर्जन करतात. एखाद्या वाहनावर कुत्र्याने मूत्रविसर्जन केलं असेल आणि संबंधित वाहन दुसऱ्या हद्दीत गेले की, कुत्रे त्या गाडीचा पाठलाग करतात. कारण अनोळखी गंधामुळे कुत्र्यांना आपल्या हद्दीत कुणीतरी आलं आहे असं वाटतं आणि भुंकण्यास उद्युक्त होतात.
दुचाकीवरुन जाताना तुमच्या मागे एखादा कुत्रा लागला तर घाबरून जाऊ नका. कारण तुम्ही घाबरून गाडीचा वेग वाढवला तर तुम्हालाच इजा होऊ शकते. अशा वेळी कुत्रा मागे लागल्यास गाडीचा वेग कमी करा. असं केल्यावर कुत्रे पळणे किंवा भुंकणं बंद करतात. काही वेळानंतर कुत्रे शांत झाल्यावर हळूहळू दुचाकी त्या जागेतून काढा आणि पुढे जा.