नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपमध्ये वादग्रस्त विधाने करणाऱ्यांची काहीच कमी नाही. शिर्ष नेतृत्वानेही वादग्रस्त विधाने टाळण्याबाबत यापूर्वी तंबी दिलेली आहेच. असे असतानाही भाजपतील मंडळींची वादग्रस्त विधाने करण्याची हौस काही भागत नसल्याची दिसते. मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य हे सुद्धा एका वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आहेत. शाक्य महोदयांचा मुलींना दिलेला सल्ला असा की, 'मुलींनो, जर तुमच्यावरील अत्याचार जर रोखायचे असतील तर, बॉयफ्रेंड बनवणे सोडून द्या'. गुना येथील एका महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार महोदयांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.
कार्यक्रमात भाषण ठोकताना महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून काहीसे अधिकच आक्रमक झालेल्या पन्नालाला शाक्य यांनी पुढे म्हटले की, आमच्या देशात महिलांची पूजा चार वेळा केली जाते. असे असेल तर आम्ही असे कसे म्हणावे की, महिलांवर अत्याचार होतो. राहिला मुद्दा महिलांवर होणाऱ्या प्रकरणांच्या आकड्यांचा. तर, आकडे काहीही सांगतात, असेही शाक्य महोदय उच्चारले.
दरम्यान, याच कार्यक्रमात पुढे बोलताना शाक्य महोदयांनी म्हटले की, आम्हाला पाश्चात्य संस्कृतीपासून दूर राहिले पाहिजे. मुली बॉयफ्रेंड करतात म्हणूनच त्यांच्यावर अत्याचार होतात. त्यांनी जर बॉयफ्रेंड बनवने सोडून दिले तर, त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत. ना मुलींनी बॉयफ्रेंड करावेत ना मुलांनी गर्लफ्रेंड असेही शाक्य आपल्या वाणीतून वधले आहेत.
दरम्यान, पन्नालाल यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीत जाऊन विवाह केला तेव्हाही पन्नालाला शाक्य महोदयांनी वादग्रस्त विधान केले होते.