श्रीनगर: एक्झिट पोलच्या निकालांवरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरु असताना आता या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवारी ट्विटरवरून यासंदर्भात भाष्य करताना एक्झिट पोलच्या आकडेवारीविषयी साशंकता व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे ठोस पुरावे देऊनही निवडणूक आयोगाकडून अजूनही शंकांचे निरसन करण्यात आलेले नाही. हे सगळे सुरु असतानाच आता एक्झिट पोलची संशयास्पद आकडेवारी समोर आली आहे. परिणामी देशात एकप्रकारची खोटी लाट निर्माण झाली आहे. या सगळ्यावरून आणखी एका बालाकोटची प्रक्रिया सुरु असल्याचे दिसत आहे, असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Worrying that despite solid evidence about EVMs being switched, @ECISVEEP hasnt clarified any of these concerns. A farcical wave backed by dubious exit polls followed by manipulating EVMs is another Balakot in the making.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) May 21, 2019
एक्झिट पोलच्या निकालांनी खचून जाऊ नका; आपली मेहनत वाया जाणार नाही- प्रियंका
जम्मू काश्मीरमध्ये ११ एप्रिल ते ६ मे या कालावधीत मतदान पार पडले होते. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) जम्मू काश्मीरच्या सहापैकी एकाही मतदारसंघात विजय मिळणार नाही. तर भाजपला जम्मूतील दोन लोकसभा मतदारसंघात विजय मिळेल. तर लडाखमध्ये काँग्रेस आणि उर्वरित तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स विजयी होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी प्रसारमाध्यमे आणि विविध संस्थांकडून मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले होते. यापैकी बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल, असे भाकीत वर्तवले आहे.
एक्झिट पोल म्हणजे ईव्हीएम यंत्रात फेरफार करण्याचा डाव- ममता बॅनर्जी