दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात होता केंद्रबिंदू

Delhi NCR earthquake गुरुवारी दुपारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. धक्के जाणवताच लोक घराबाहेर धावत सुटले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 11, 2024, 03:41 PM IST
दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात होता केंद्रबिंदू  title=

Earthquake Tremors : दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी दिल्ली आणि इतर उत्तरेकडील राज्यांतून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात याचा परिणाम जाणवत आहे. अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 2.50 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के खूप तीव्र होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची झाल्याची शक्यता आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास दिल्ली-एनसीआर, पंजाबसह चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपामुळे पुन्हा एकदा जमीन हारदरली. बराच वेळ या भूकंपाचे हे धक्के जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता आणि हिंदुकुश भागात त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती.

माध्यमांच्या वृत्तानुसार, नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम, सोनीपतसह संपूर्ण दिल्ली एनसीआरमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. चंदीगड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सध्या या भूकंपामुळे भारतात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर भूकंपामुळे दिल्ली-एनसीआरच्या उंच इमारतींमध्ये राहणारे लोकही घाबरले आहेत. नोएडा, गुरुग्राम आणि फरीदाबादच्या सोसायट्यांमधून लोक पळत बाहेर आले. कार्यालयांमध्येही जेवणाच्या वेळी हा सगळा प्रकार घडल्याने लोकांनी तात्काळ बाहेर धाव घेतली.