नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेचा निकाल येणं अजूनही सुरूच आहे. लोकसभा निडवणूक २०१९ निकालांत हाती आलेल्या कलानुसार, अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत आहेत. मध्यप्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकताना दिसतोय. राजधानी भोपाळमधून भाजपानं यावेळी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप साध्वी प्रज्ञा सिंह हिला उमेदवारी दिली होती. परंतु, धक्कादायक म्हणजे साध्वी प्रज्ञा हिनं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना मागे टाकल्याचं निकालांवरून स्पष्ट दिसतंय. त्यामुळे, साध्वीचा विजय पक्का आहे, असं मानलं जातंय.
बेगुसराय, वाराणसी, अमेठी, केरळ या मतदार संघांसोबतच वादग्रस्त साध्वीच्या निवडणुकीतील प्रवेशानं हा मतदारसंघ खूपच चर्चेत राहिला. त्यानंतर, वेळोवेळी साध्वी प्रज्ञा हिनं केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे या मतदारसंघासहीत सगळा देशच ढवळून निघाला.
साध्वी यांनी हेमंत करकरे यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य केले होते. टीकेनंतर या वक्तव्यावर साध्वीनं माफीनामाही सादर केला. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र आपण साध्वीला कधीही माफ करणार नसल्याचं म्हटलंय.
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहे. सध्या जामिनावर असलेली साध्वी प्रज्ञा भोपाळ मतदार संघातून निवडून आल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.