Video : ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; जाणून घ्या काय घडलं?

Suhaildev Express : दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशच्या गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांनी शुक्रवारी तिकीट कलेक्टरला टॉयलेटमध्ये बंद करुन ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 13, 2023, 08:29 AM IST
Video : ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; जाणून घ्या काय घडलं? title=

Indian Railway : देशभरात मोदी सरकारने वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) रुळावर आणून भारतीय रेल्वेमध्ये क्रांती आणली आहे. तर दुसरीकडे भारतीय रेल्वेच्या इतर प्रवासी गाड्यांमध्ये गोंधळ सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना नवनवीन समस्यांना समोरे जावे लागत आहे. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुहेलदेव एक्स्प्रेसच्या (suhaildev express) दोन बोगींमध्ये वीज (Power Supply) नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. यावर संतप्त झालेल्या प्रवाशांनी टीटीईला शौचालयात कोंडून ठेवलं होतं. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये शुक्रवारी ही विचित्र घटना घडली. ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये वीज गेल्याने प्रवाशांनी ट्रेन तिकीट परीक्षकांना (टीटीई) शौचालयामध्ये बंद करुन ठेवले होते. शुक्रवारी ही ट्रेन दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून गाझीपूरला जात असताना हा सगळा प्रकार घडला.

सुहेलदेव एक्सप्रेस दिल्लीतील आनंद विहार येथून संध्याकाळी 6.45 वाजता सुटते आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूरला पोहोचते. आनंद विहार टर्मिनलवरून सुटल्यानंतर काही वेळातच ट्रेनच्या B1 आणि B2 डब्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे एसीही बंद पडले. संतप्त प्रवाशांनी या घटनेची तक्रार टीटीईकडे केली. त्यांनी गोंधळ घातला आणि टीटीईला शौचालयात कोंडले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवासी टीटीईला शौचालयात जाण्यास सांगत आहेत.

पीटीआयच्या व्हिडीओमध्ये, प्रवाशी टीटीईला टॉयलेटमध्ये बंद करण्यासाठी आत ढकलत आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुण टीटीई सांगत आहेत की कानपूरच्या आधी ट्रेन बनवता येणार नाही. कानपूरच्या आधी समस्या सुटणार नाही, असे म्हणताना दिसत आहे. काही लोक सेकंड एसी मध्ये जाण्याबद्दल बोलत आहेत. व्हिडिओमध्ये 2-3 कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

नंतर ट्रेन तुंडला स्थानकावर आल्यावर आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शांत केले आणि वीजेची समस्या लवकरच सोडवली जाईल असे आश्वासन दिले. त्यांनी टीटीईलाही लोकांच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर अभियंत्यांनी विद्युत बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर ट्रेन गाझीपूरला पोहोचली. मात्र तांत्रिक बिघाडासाठी टीटीईला जबाबदार धरणे योग्य नाही. ते रेल्वेच्या व्यावसायिक विभागाचे कर्मचारी आहेत. वीज विभागाचा स्वतंत्र विभाग आहे.

दरम्यान, वीज बिघाडासाठी टीटीई कसे जबाबदार आहे? त्यांना अशी वागणूक मिळायला नको होती. अशा लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी, अशा प्रतिक्रिया लोक आता देत आहेत. मला या लोकांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, पण टीटीईसोबत असे का? यामागे काय विचार असू शकतो, समजू शकलो नाही, अतिशय लाजिरवाणे, दोष दुसऱ्या विभागाचा शिक्षा दुसऱ्या विभागाला. एसीवाले प्रवासी सुशिक्षित असतात आणि काम अशिक्षितासारखे करतात. त्या डब्यातील प्रवाशांविरुद्ध एफआयआर नोंदवावा, अशा संतप्त प्रतिक्रिया लोक देत आहेत.