मुंबईः अनेक जण आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी झाडं तोडतात. त्यामुळे पृथ्वीवरून जंगले हळूहळू नष्ट होत आहेत. याउलट आज आम्ही तुम्हाला असे घर दाखवणार आहोत, ज्याला पाहून तुम्ही हे घर बांधणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत राहाल. या व्यक्तीने 40 फूट उंच आंब्याचे झाड न कापता त्याच जागेवर 4 मजली सुंदर घर बांधलं आहे.
हे घर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. शाही राजवाडे, सुंदर मंदिरे आणि बागांसाठी प्रसिद्ध उदयपूरमध्ये हे घर आहे. कुल प्रदीप सिंग नावाच्या आयआयटी इंजिनीअरने 80 वर्ष जुनं झाड न तोडता सन 2000मध्ये हे घर बांधलं.
'ट्री हाऊस' म्हणून ओळखले जाणारे हे घर 'फुल फर्निश्ड' आहे. हे घर बांधण्यासाठी पर्यावरणप्रेमी अभियंता कुल प्रदीप सिंग यांनी झाडाची एक फांदीही तोडली नाही.
केपी सिंह यांनी आपल्या स्वप्नातील हे घर जमिनीपासून 9 फूट उंचीवर बांधले आहे. या घराची उंची सुमारे 40 फूट आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 4 मजली घर बांधण्यासाठी सिमेंटचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. स्टील, सेल्युलर आणि फायबर शीट वापरून हे घर बांधण्यात आले आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे जोराचा वारा वाहतो तेव्हा घर डोलायला लागते. केपी सिंह यांनी त्यांच्या स्वप्नातील घराची रचना झाडाच्या फांद्यांनुसार केली आहे. त्याने सोफा स्टँड म्हणून डहाळी आणि टीव्ही स्टँड म्हणून डहाळी वापरली आहे. या घरात स्वयंपाकघर, बाथरूम, बेडरूम, डायनिंग हॉल आणि लायब्ररीसह सर्व सुविधा आहेत.
किचन, बेडरुम, लायब्ररी इत्यादींमधून झाडांच्या फांद्या बाहेर आल्याचे चित्रांमध्ये दिसून येते. आंब्याच्या मोसमात जेव्हा झाडाला आंबे येतात, तेव्हा ते घरामध्येही लटकलेले दिसतात. घरात अनेक खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक पक्षीही घरात येत राहतात.