गाडीमधील पेट्रोल किंवा डिझेलची टाकी फुल करणं धोकादायक? इंडियन ऑइलकडून सत्य समोर

तुम्ही देखील तुमच्या गाडीची टाकी फुल करत असाल, तर या बातमी मागचं सत्य जाणून घ्या.

Updated: Apr 10, 2022, 08:13 PM IST
गाडीमधील पेट्रोल किंवा डिझेलची टाकी फुल करणं धोकादायक? इंडियन ऑइलकडून सत्य समोर title=

मुंबई : काही लोक लांबच्या प्रवासाला जाताना आपली गाडी पेट्रोल पंपावरती फुल करतात. ज्यामुळे प्रवासात कुठेही इंधन मिळालं नाही, तर कोणतीही समस्या उद्भवत नाही. परंतु यासंदर्भात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की, उन्हाळ्यात पेट्रोल किंवा डिझेलची टाकी पूर्ण भरणे धोकादायक ठरू शकते. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर जरा सावध राहा. खरेतर इंडिया ऑइलने याबाबत माहिती जारी केली आहे. जी सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या गाडीची टाकी फुल करत असाल तर या बातमी मागचं सत्य जाणून घ्या.

खरेतर इंडिया ऑइलने अशा संदेशांना बनावट म्हटले आहे. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या भरणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

मेसेजमध्ये काय म्हटलंय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये येत्या काही दिवसांत तापमान वाढणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत तुमच्या वाहनात पेट्रोल भरू नका. यामुळे स्फोट होऊ शकतो. या आठवड्यात टाकी फुल केल्यामुळे चार स्फोट झाल्याचे व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे. यासोबतच टाकी उघडी ठेवून हवा त्यातून पास होऊन द्यावी, असा सल्ला त्यामध्ये दिला गेला आहे.

इंडियन ऑइलचं म्हणणे काय?

इंडियन ऑइलने या अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितलं की, या सगळ्या बातम्या फसव्या आहेत आणि तुम्ही तुमच्या गाडीची टाकी फुल करु शकता. यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हिवाळा किंवा उन्हाळा असा ऋतुंची पर्वा न करता जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत वाहनांमध्ये इंधन भरणे पूर्णपणे सुरक्षित आहे.