VIDEO: सिंधू बॉर्डरवर पुन्हा तणाव, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

 संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूर आणि बळाचा वापर करावा लागला.

Updated: Jan 29, 2021, 03:47 PM IST
VIDEO: सिंधू बॉर्डरवर पुन्हा तणाव, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर title=

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनादिवशी राजपथावर परेडदरम्यान एका गटानं हिंसक प्रदर्शनं केली. ही घटना ताजी असताना आज पुन्हा सिंधू बॉर्डरवर जोरदार प्रदर्शनं झाली. आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबची झाली. यादरम्यान तुफान दगडफेक, लाठीचार्ज झाला. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूर आणि बळाचा वापर करावा लागला.

स्थानिकांनी हिंसक निदर्शनं केली आहेत. दिल्लीच्या अलिपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ प्रदीप पालीवाल हे सिंधू बॉर्डरवर झालेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनांमध्ये जखमी झाले. आंदोलकांनी तलवारीने त्याच्यावर हल्ला केला होता. सिंधू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिक लोकांनी आता तीव्र निदर्शनं केली.

सिंधू बॉर्डरवरून शेतकऱ्यांनी बाजूला व्हावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सिंधू बॉर्डर पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. 'खलिस्तान मुर्दाबाद' आणि 'भारत माता की जय' अशी घोषणा स्थानिक आंदोलक देत आहेत.

सिंधू सीमेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावऱण झालं आहे. सिंधू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात आता स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. शेतकरी आणि स्थानिकांचं आंदोलन यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचं जवळपास 65 दिवसांहून अधिक दिवस सिंधू बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यातील बदलेल्या धोरणांविरोधात हे आंदोलन शेतकऱ्यांनी केलं होतं. प्रजासत्ताक दिनादिवशी राजपथावर परेडदरम्यान शेतकरी आंदोलनातील एका गटानं हिंसक निदर्शनं केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा हा तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे.