कारमध्ये अडकला 3 वर्षांचा मुलगा; नंतर वडिलांनी जे केलं ते सर्वांसाठीच धडा घेण्यासारखं

3 Year Old Son Locked Himself In Car: मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी त्याचे वडील गेले असता मुलाने स्वत:ला कारच्या चावीसहीत कारमध्ये कोंडून घेतलं आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम या व्यक्तीने सांगितला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 25, 2023, 09:31 AM IST
कारमध्ये अडकला 3 वर्षांचा मुलगा; नंतर वडिलांनी जे केलं ते सर्वांसाठीच धडा घेण्यासारखं title=
मदत मागितली असता ती येण्यासाठी वेळ लागेल असं या व्यक्तीच्या लक्षात आलं

3 Year Old Son Locked Himself In Car: लहान मुलं गाडीमध्ये अडकल्याने गुदमरल्याच्या बातम्या अनेकदा सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये ऐकायला मिळतात. बरेच पालक मुलांना गाडीत ठेऊन कुठे जाताना अधिक सतर्क असतात. मात्र दरवेळेस असं होत नाही. अनेकदा पूर्ण काळजी घेतल्यानंतरही मुलं गाडीमध्ये अडकल्याच्या घटना घडतात. लुधियानामधील एका व्यक्तीबरोबर असाच काहीसा प्रकार घडला. नजर चुकवून गाडीमध्ये जाऊन बसलेली 3 वर्षांचा मुलगा अडकून पडला. मात्र या मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने निर्णय घेतला ज्यामुळे या मुलाचा जीव तर वाचला. या प्रकरणातून इतरांनाही धडा मिळाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

फोन करुन मदत मागितली पण...

ज्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला त्याचं नाव सुंदरदीप सिंग असं आहे. सुंदरदीप यांनीच ट्वीटरवरुन घडलेल्या प्रकारासंदर्भातील माहिती दिली आहे. मुलाला घेण्यासाठी सुंदरदीप त्याच्या शाळेत घेले होते. मुलाला कारकडे घेऊन येताना त्याने वडिलांच्या हातातील चावी खेचली आणि गाडीत जाऊन बसला. या मुलाने चुकून स्वत:ला कारमध्ये लॉक करुन घेतलं. कार ऑटोलॉक झाल्याने थोड्या वेळात मुलाला गुदमरल्यासारखं वाटू लागलं. दरम्यान दुसरीकडे सुंदरदीप कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना आणि भावाला फोन करुन मदत मागितली. सर्वांनीच तिथे पोहोचायला किमान 10 ते 15 मिनिटं लागतील असं सांगितलं. मात्र गाडीमध्ये बसलेल्या मुलाला श्वास कमी पडू लागला आणि भीतीमुळे त्याला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं. 

...अन् मुलाची सुटका झाली

अशा प्रसंगामध्ये अनेकदा काय करावं हे सुचत नाही. सुंदरदीप यांनाही आपण जितका जास्त वेळ वाट पाहत राहणार तितका मुलाला अधिक त्रास होणार याची जाणीव झाली. ही घटना घडली तिथे समोरच पंक्चर काढणाऱ्याचं दुकान होतं. सुंदरदीप यांनी येथील एका कर्मचाऱ्याला त्यांच्याकडी सर्वात मोठा हतोडा घेऊन येण्यास सांगितलं. हा कर्मचारी हातोडा घेऊन आल्यानंतर सुंदरदीप यांनी कारच्या डावीकडील मागच्या दाराच्या आणि डिकीदरम्यान असलेली कारची छोटी साईड विंडो तोडण्यास सांगितली. हातोड्याने 4 ते 5 वेळा दणका दिल्यानंतर या खिडकीची काच तुटली. त्यानंतर या मुलाने तुटलेल्या काचेमधून आपल्या वडिलांकडे चावी सोपवली आणि या मुलाची सुटका झाली.

पालकांना आवाहन

सुंदरदीप सिंग यांनी अनेक ट्वीट केले आहेत. त्यांनी शेवटच्या ट्वीटमध्ये यामधून मला एक मोठा धडा मिळाला. माझं सर्व पालकांना आवाहन आहे की आपल्या मुलांच्या हातात कधीच कारची चावी देऊ नये. ही मुलं स्वत:ला अडचणीत आणतात. आपण ही चूक कधीच पुन्हा करणार नाही, असं सुंदरदीप यांनी म्हटलं आहे.