नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मतदान यंत्रात (ईव्हीएम) केल्या जाणाऱ्या फेरफारीच्या आरोपांना उधळून लावलं आहे. दिवसेंदिवस काँग्रेसचा वेडेपणा वाढत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. लंडनमध्ये ईव्हीएम हॅकथॉनमध्ये ज्यावेळी एका सायबर तज्ज्ञाने २०१४ च्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रात मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आल्याचा दावा केला होता, त्यानंतरच जेटली यांनी यावर आपलं मत मांडत काँग्रेसवर निशाणा साधला.
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी लिहिलं, 'निवडणूक आयोग आणि त्या प्रक्रियेत सहभागी लाखो लोक या फेरफारीत सहभागी होते? आणि जेव्हा यूपीएच्या सत्तेत भाजपला यश मिळालं. हा निव्वळ वेडेपणा आहे.' जेटलींचं हे ट्विट पाहता त्यांनी थेट शब्दांत सर्व आरोप फेटाळून लावल्याचं स्पष्ट होत आहे.
'सर्वप्रथम राफेल घोटाळा, त्यानंतर १५ उद्योगपतींच्या कर्जमाफीची बाब आणि आता ईव्हीएम फेरफारीचा मुद्दा या गोष्टी काँग्रेसने उचलून धरल्या खऱ्या पण, खरंच काँग्रेसला असं वाटतं का, की जनता इतकी साधीभोळी आहे? उलटसुलट गोष्टी त्यांना खऱ्या वाटतील. काँग्रेसचा हा वेडेपणा दिवसागणिक वाढत असून, तो धोक्याची पातळी ओलांडू शकतो', असं जेटली म्हणाल्याचं वृत्त 'नवभारत टाईम्स'ने प्रसिद्ध केलं आहे.
Was the Election Commission & millions of Staffers involved in manufacturing, programming of EVMs & conduct of elections during the UPA Government in collusion with the BJP – absolutely rubbish.
— Arun Jaitley (@arunjaitley) January 21, 2019
After Rafale, the non-existent loan waiver to 15 industrialists – the next big lie – EVM hacking.
— Arun Jaitley (@arunjaitley) January 21, 2019
२०१४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांमधील ईव्हीएम यंत्र घोटाळ्याची माहिती असल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकी सायबर तज्ज्ञाने केला होता.
लंडन येथे एका पत्रकार परिषदेत त्याने हा गौप्यस्फोट केला ज्यावेळी परिषदेला काँग्रेस नेते कपिल सिब्बलही उपस्थित होते. २०१४ साली मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार करण्यात आले होते, असं तो यावेळी म्हणाला. ग्रेफाईट ट्रान्समीटरच्या मदतीने ईव्हीएम यंत्र उघडता येतात. २०१४ मध्ये भाजपने या ट्रान्समीटरचा वापर केला होता हा खळबळजनक दावा त्याने केला.