नवी दिल्ली: श्रीनगरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी एमआय-१७ व्हीएफ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत वायूदलाच्या पाच अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय वायूदलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सीमारेषेवर तणावाचे वातावरण असताना हा प्रकार घडला होता. यावेळी पाकिस्तानी विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा गैरसमज झाल्यामुळे वायूदलाकडून स्वत:चेच विमान पाडले गेले. यामध्ये वायूदलाच्या सहा जवानांचा मृत्यू झाला होता.
यानंतर हवाईदलाकडून या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. यावेळी हवाई दलातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
एअर मार्शल हरी कुमार या मोहीमेचे प्रमुख होते. त्यावेळी वायूदलाच्या स्पायडर या सुरक्षारक्षक प्रणालीतून हेलिकॉप्टरवर क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. दोषी अधिकाऱ्यांमध्ये एक ग्रूप कॅप्टन, दोन विंग कमांडर आणि दोन फ्लाईट लेफ्टनंटचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणा आणि हेलिकॉप्टरवर क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी योग्य प्रक्रियेचा अवलंब न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. चौकशीअंती हे सर्वजण दोषी आढळले आहेत.
बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. तेव्हा भारतीय विमानांनी त्यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे पाकिस्तानकडूनच हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचा समज झाला होता. मात्र, हे ठिकाणदेखील दुर्घटनास्थळापासून १०० किलोमीटर अंतरावर असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेच्यावेळी श्रीनगर हवाईतळावरील अधिकाऱ्यांनी गैरसमजातून आपल्याच हेलिकॉप्टरवर क्षेपणास्त्र डागले. नियोजित मोहीम फत्ते न झाल्याने एमआय-१७ व्हीएफ हेलिकॉप्टर अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतत होते. हेलिकॉप्टर हवेत झेपावल्यानंतर साधारण १० मिनिटांमध्येच हा प्रकार घडला होता.