बिहार, आसाममध्ये पुरामुळे हाहाकार; लाखो हेक्टर शेती पाण्याखाली

जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत...

Updated: Aug 18, 2020, 07:59 AM IST
बिहार, आसाममध्ये पुरामुळे हाहाकार; लाखो हेक्टर शेती पाण्याखाली title=
फोटो सौजन्य : PTI

नवी दिल्ली : बिहारमध्ये पुराचा कहर सुरुच आहे. काही भागात पुराचं पाणी कमी झालं असलं तरी, शेतात पुराचं पाणी शिरल्यामुळे पुरग्रस्तांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील 16 जिल्ह्यातील 130 भागात अद्यापही पुराचं पाणी पसरलेलं आहे. आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास आठ लाख हेक्टरमधील शेती पूर्णपणे पाण्यात गेली आहे.

उत्तर पूर्व राज्यातील आसाममध्येही पाऊस-पुरामुळे लोकांचं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. सिंगरा नदीची पाणी पातळी वाढल्याने अनेक लोक डुबल्याची माहिती आहे. आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला तर भूस्खलनामध्ये 26 जण दगावले. तीन पूरग्रस्त जिल्ह्यात 28 गाव आणि 1535 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

गुजरातमध्येही पुराचा कहर असून सूरत, जामनगर आणि वडोदरामध्ये पूरस्थिती गंभार आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस वडोदरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये नेपाळच्या बैराजमधून जवळपास 3 लाख क्यूसेक पाणी सोडल्यामुळे घाघरा नदीची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.