अभिमानास्पद! ४ महिला पायलट्सने रचला इतिहास

खांद्यावर २०० प्रवाशांची जबाबदारी 

Updated: Jan 12, 2021, 09:42 AM IST
अभिमानास्पद! ४ महिला पायलट्सने रचला इतिहास

मुंबई : जगभरात भारतीय महिला आपल्या देशाचं नाव उंचावेल अशी कामगिरी करत आहेत. भारतीय महिला पायलट्स यांनी देखील आपण काही कमी नाहीत हे दाखवून दिलं आहे. ही बातमी आहे एअर इंडियाच्या ४ महिला पायलट्सची..... 

अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली ते भारतातली सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूपर्यंतचा सलग प्रवास एका विमानानं केला. अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्कोमधून एका विमानानं दोनशे प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं. आणि बंगळुरूच्या कॅम्पेगौडा एअरपोर्टवर लँडिंग केलं. तुम्हाला वाटेल यात काय विशेष.... पण त्यामागची ही बातमी महत्वाची आहे. 

एअर इंडियाच्या या फ्लाईटनं सॅनफ्रॅन्सिस्को ते बंगळुरू असा १६ तासांचा सलग प्रवास केला आहे. कुठेही लँडिंग न करता हा प्रवास पूर्ण केला असल्यामुळे सर्वच स्तरावरून यांचं कौतुक होत आहे. महत्वाची बाब म्हणजे या फ्लाईटच्या सगळ्या पायलट्स या महिला होत्या. तसेच सगळ्या क्रू मेंबर्सही महिलाच होत्या. या प्रवासात १० टन इंधनाचीही बचत झाली. 

नेहमीसारख्या फ्लाईटसारखंच हे फ्लाईट होतं..... पण कॉकपिटमध्ये सगळ्या महिलाच असणं हे फीलिंग त्यांच्यासाठीही भारी होतं. या फ्लाईटमधून आलेल्या प्रवाशांनाही याचा अभिमान होता.... नव्या आकाशात नवी भरारी घेणाऱ्या या नारीशक्तीला आमचाही सलाम