दूध पिशव्या टाकणाऱ्याने निवडला हा व्यवसाय... आज काढतोय 8 कोटींचा टर्नओव्हर

कधी कुरिअर डिलिव्हरी बॉय तर कधी पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावं लागलं. पण त्या एका गोष्टीनं आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली.

Updated: Nov 2, 2021, 08:21 PM IST
दूध पिशव्या टाकणाऱ्याने निवडला हा व्यवसाय... आज काढतोय 8 कोटींचा टर्नओव्हर title=

नवी दिल्ली: दूध पिशव्या टाकणाऱ्याला केवळ 200 रूपये मिळायचे. मात्र ते पुरत नसल्याने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. मात्र हातातली नोकरीही गेली. अखेर करायचं काय? जगायचं कसं हा प्रश्न समोर होताच. परिस्थितीला हरून न जाता मोठ्या जिद्दीनं तो पुन्हा उभा राहिला. मित्राकडून काही पैसे उधार घेतले आणि छोटेखानी स्वत:चा उद्योग सुरू केला. आजच्या घडीला 8 कोटींचा टर्नओव्हर त्याच्या व्यवसायातून निघत आहे. 

नोकरी गेल्यानंतर अनेक लोक तणावाखाली जातात आणि हिंमत गमावतात. नोकरी गमावल्यानंतर आपल्या मनाचे ऐकलं आणि आज एक मोठा उद्योगपती झाला. आज त्याची वार्षिक उलाढाल 8 कोटी रुपये आहे. दिल्लीत राहणाऱ्या सुनील वशिष्ठ यांची ही संघर्षगाथा आहे. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने केवळ 10 वीपर्यंतच शिकता आलं. पुढे मिळेल ते काम करून पैसे मिळवणे हाच एक मार्ग होता. 

सुनील यांना कधी कुरिअर डिलिव्हरी बॉय तर कधी पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावं लागलं. सुनील सांगतात की, 1991 मध्ये त्यांनी दिल्लीतील डीएमएसच्या बूथवर दुधाच्या पिशव्या वाटण्याचंही पार्टटाइम काम केलं आहे. या कामासाठी त्यांना महिन्याला 200 रुपये पगार मिळत होता.

पुढे हातात पैसे येऊ लागले तसं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा झाली. कॉलेजला अॅडमिशन घेतली आणि त्याच सोबत डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं. मात्र शिक्षणातून हळूहळू मन उडालं. तसं त्यांनी शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दीड वर्ष कुरिअर कंपनीमध्ये काम केलं पण दुर्दैवानं कुरिअर कंपनीच बंद झाली. पुन्हा एकदा हात रिकामे झाले. 1997 मध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करत पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम मिळालं. 

सुनील यांनी ही नोकरी खूप मनापासून केली. सगळं काही सुरळीत सुरू होतं. लग्न झालं आणि पत्नी गर्भवती राहिली. त्यावेळी तिची काळजी घेण्यासाठी आणि रुग्णालयात दाखल कऱण्यासाठी सुनील यांना सुट्टी मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी सहकाऱ्याला आपलं काम सोपवलं आणि रुग्णालयात पत्नीसोबत गेले. त्यांच्या या वर्तनामुळे कंपनीतून त्यांना काढून टाकण्यात आलं. 

नोकरी गेल्यानंतर सुनील यांचं आयुष्य पूर्ण बदललं. जेएनयूसमोर फूड स्टॉल चालू केला. मात्र अवैध असल्याचं सांगून त्यावर एमसीडीने कारवाई केली. त्यांनी विचार केला आपल्या भागात कोणत्या गोष्टीची जास्त गरज आहे. त्यांनी आपल्या मनाचं ऐकलं. त्यांचा डोक्यात एक कल्पना आली. आपण स्वत:चा एक छोटासा व्यवसाय का सुरू करू नये. 

सुनील यांनी झपाट्याने वाढणाऱ्या नोएडामध्ये केक शॉप उघडण्याची संधी सोडली नाही. त्यांनी मित्राकडून पैसे उधार घेऊन नोएडाच्या शॉप्रिक्स मॉलमध्ये दुकान थाटले. फ्लाइंग केक्स असे या दुकानाचे नाव आहे. त्यांनी बनवलेले ताजे केक लोकांना आवडू लागले आणि लवकरच त्यांच्या केकची मागणी वाढू लागली. 

सुनीलला छोट्या खासगी कंपन्यांकडून केकची ऑर्डर मिळू लागली आणि काम सुरू झाले. आज फ्लाइंग केक्सच्या अनेक फ्रँचायझी आणि आउटलेट उघडल्या आहेत आणि आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 8 कोटींहून अधिक आहे.