Gautam Adani Networth: जगभरातील आणि प्रामुख्यानं भारतातील श्रीमंतांचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो, तेव्हातेव्हा काही नावं आवर्जून घेतली जातात. मुकेश अंबानी, गौतम अदानी ही तिच नावं. उद्योग क्षेत्रामध्ये नवनवीन यशशिखरं सर करणाऱ्या मुकेश अंबानी यांनी नुकतंच मोठं यश संपादन करत फोर्ब्सच्या 2024 या वर्षातील श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
2024 या वर्षातील 100 सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत बाजी मारत त्यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. फोर्ब्सच्याच माध्यमातून याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली. जिथं भारतातील पहिल्या 100 श्रीमंतांच्या एकूण कमाईची संख्या 1 ट्रिलियन डॉलरपलिकडे पोहोचली आहे.
जाणकारांच्या मते मुकेश अंबानी यांच्यावतीनं रिलायन्स कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केल्यानंतर कमाईत ही एकूण वाढ झाल्याचं निदर्शनास आलं. फोर्ब्सच्या माहितीनुसार डॉलरच्या तुलनेत अंबानी सर्वाधिक नफ्यात असणारे दुसरे उद्योजक ठरले आहेत. मागील वर्षभरात त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा 27.5 बिलियन डॉलरहून 119.5 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. सध्याच्या घडीला अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 13 व्या स्थानी असून, त्यांची आजच्या घडीला असणारी एकूण कमाई 108.3 बिलियन डॉलर इतकी आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार भारतीय शेअर बाजारातील एकंदर कामगिरी पाहता आयपीओ आणि म्युच्युअल फंडमुळं मिळालेल्या दमदार पकरताव्यामुळं भारतातील श्रीमंत मंडळी दिवसागणिक श्रीमंत होत राहिले. सध्या स्टॉक मार्केटचा उत्साह सर्वात वाखाणण्याजोगा असून, बीएसई सेंसेक्स मागील वर्षाहून 30 टक्के अधिक वाढला असून, त्यामुळं शेअर बाजारात चांगली कामगिरी होताना दिसत आहे.
अदानी उद्योग समुहाच्या अध्यक्षपदी असणारे गौतम अदानी यांनी फोर्ब्सच्या यादीत 116 बिलियन डॉलर इतकी कमाई केली असून, ते या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्या मागोमाग 43.7 बिलियन डॉलरसह सावित्री जिंदल यांचं नाव आहे. अदानंनी मागच्या वर्षभरात सर्वाधिक नफा कमवत एक नवा विक्रम केला. ज्यामुळं श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी अंबानी असले तरीही चर्चा मात्र गौतम अदानी यांच्याच नावाची झाली.