नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ९ नोव्हेंबरला पाकिस्तानच्या कर्तारपूर गुरुद्वारात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिले. हे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी स्वीकारले.
काही दिवसांपूर्वीच कर्तारपूर कॉरिडोअरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानकडून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मनमोहन सिंग हे शीख समाजाचे प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळे आम्ही मनमोहन सिंग यांना निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मोहम्मद कुरेशी यांनी दिली होती. मात्र, हे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी नाकारले होते.
'इम्रान खान यांना विमान प्रवासासाठीही पैशांची जुळवाजळव करावी लागतेय'
यानंतर आता ते कॅ. अमरिंदर सिंग यांच्या निमंत्रणाला मान देऊन कर्तारपूरला जातील. कर्तारपूरला जाणाऱ्या या शिष्टमंडळात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही समावेश आहे.
विशेष गोष्ट म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एकदाही पाकिस्तानमध्ये गेले नव्हते. त्यांचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह येथे झाला होता. मात्र, फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अमृतसर येथे स्थायिक झाले.
VIDEO: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचाराची ऐसी तैशी; एकाच जागी ढिम्म बसून
९ नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडोअर भाविकांसाठी खुला होईल. या मार्गिकेमुळे कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि गुरूदासपूर येथील डेरा बाबा नानक जोडले जाणार आहेत. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५२२ मध्ये कर्तारपूर साहिब दर्ग्याची स्थापना केली होती. कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय यात्रेकरुंना व्हिसा आवश्यक नसेल. फक्त त्यांना परवाना घ्यावा लागेल.