Adani Hindenburg Case: हिंडेनबर्ग (Hindenburg) प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयाचं उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी स्वागत केलं आहे. गौतम अदानी यांनी ट्वीट करत सत्याचा विजय होईल असं विधान केलं आहे. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी (Hindenburg Report on Adani) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सेबीला (SEBI) चौकशीचा आदेश दिला आहे. तसंच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. 'सेबी’ अधिक सक्षम करण्यासाठी दाखल जनहित याचिकांवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.
सुप्रीम कोर्टाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. या समितीत एएम सप्रे यांच्यासह ओपी भट्ट, न्यायमूर्ती जेपी देवदत्त, केव्ही कामत, एन नीलेकणी, सोमशेखर सुंदरसन यांचा समावेश आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काही वेळातच गौतम अदानी यांनी ट्वीट करत स्वागत केलं आणि सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. "अदानी ग्रुप सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत आहे. वेळ मर्यादेत सर्व गोष्टी समोर येतील आणि सत्याचा विजय होईल," असं गौतम अदानी म्हणाले आहेत.
The Adani Group welcomes the order of the Hon'ble Supreme Court. It will bring finality in a time bound manner. Truth will prevail.
— Gautam Adani (@gautam_adani) March 2, 2023
दरम्यान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सेबीला दोन महिन्यात तपास पूर्ण करत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान तज्ज्ञांची समिती अदानी समूहाची चौकशी करणार असून उपाययोजना सुचवणार आहे. सुप्रीम कोर्टाने सेबीच्या नियमांचं उल्लंघन झालं का? तसंच स्टॉकच्या किंमतींमध्ये (Stock Price) फेरफार केला आहे का? याची चौकशी करण्यास सेबीला सांगितलं आहे.