Girl Stunt Video In Metro: दिल्लीमधील मेट्रो ही प्रवाशांपेक्षा नको त्या कारणांमुळेच चर्चेत असते. कधी जोडप्यांचे किसींगचे व्हिडीओ, कधी हाणामारी तर कधी सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्सचे व्हिडीओंमुळे दिल्ली मेट्रो चर्चेत असल्याचं पहायला मिळतं. सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्ससाठी दिल्ली मेट्रो तर हक्काचं ठिकाण झाल्याप्रमाणे त्यात अभिनयापासून, डान्सपासून, प्रँक्सपर्यंत अनेक प्रकारचे व्हिडीओ शूट केले जातात. मात्र दिल्ली मेट्रो या असल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असतानाच आता तेथील हा ट्रेण्ड देशातील इतर ठिकाणांवरही दिसून येत आहे. अर्थात मेट्रोत अशा सगळ्या गोष्टी करणं नियमानुसार चुकीचं असलं तर अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी नियमांना हरताळ फासून हे असली स्टंटबाजी केली जाते. सोशल मीडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बंगळुरु मेट्रोमध्ये शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शूट करण्यात आला तेव्हा मेट्रोमध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे. तरीही ही तरुणी स्टंटबाजीमध्ये गुंग असल्याचं दिसत आहे. या तरुणीने स्टंटबाजी सुरु केल्यानंतर तिने मारलेली फ्लिप (हात टेकवून उभ्यानेच मारलेली कोलांटी उडी) पाहून मेट्रोमधील अनेकजण नजरा रोखून आश्चर्यचकित होत तिच्याकडे पाहू लागले. मीशा शर्मा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 44 हजारांहून अधिक लाईक्स असल्याचं दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी या मुलीने दाखवलेल्या स्टंटचं कौतुक केलं आहे. तर काहींनी या मुलीने गरज नसताना मुद्दाम हा व्हिडीओ शूट करुन जाहिरातबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचा टोला लागवला आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि व्हायरल होण्याच्या उद्देशाने व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे असं काहींनी म्हटलं आहे. "असं काहीतरी करायला आत्मविश्वास लागतो," असं या तरुणीची बाजू घेणाऱ्या एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने या मुलीची स्टंटबाजी पाहून, "एक दिवस ही स्वत:चं तोंड फोडून घेणार आहे," असा खोचक टोला लगावला आहे. अन्य एकाने मी याच मेट्रोमधून प्रवास करत होतो असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ जून महिन्यात अपलोड करण्यात आलेला असला तरी तो पुन्हा व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
केलेला स्टंट उत्तम आहे पण हे असं कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या वाहनांमध्ये करणं बेकायदेशीर आहे, असं एकाने म्हटलं आहे. अनेकांनी उत्तम प्रकारे फ्लिप मारल्याचं कमेंट करुन म्हटलं आहे. एकाने तर आपल्यालाही असं काहीतरी करायचं आहे असं म्हटलं. पण अशी स्टंटबाजी करणं आणि त्याचा व्हिडीओ पोस्ट करणं एखाद्याला नक्कीच अडचणीत आणू शकतं. त्यामुळे असं काही करायचा विचार असेल वेळीच सावध व्हा.