मुंबई : कोरोना व्हायरसचा परिणाम आता सोन्याच्या किमतींवरही होताना दिसतो आहे. सोन्याच्या किमती तोळ्यामागे ४२ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्य़ा आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेल, आणि डॉलरच्या उसळीचा परिणाम सोन्याच्या किमती वाढण्यावर दिसून येतो आहे. खनिज तेलाच्या किमती प्रतिपिंप ६० डॉलरपर्यंत पोहचल्या आहेत.
मुंबईत गुरुवारी तोळ्यामागे सोन्याचा दर ४१, ५७५ रुपायांपर्यंत पोहोचला होता. तर मुंबईप्रमाणेच दिल्लीतही सोन्याच्या दराची उसळी कायम आहे. तोळ्याला ४२,५०० चा दर मिळतो आहे. सोन्याच्या अचानक वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये आणि सराफा बाजारात चिंतेचं वातावरण आहे.
कोरोनामुळे चिनी वस्तूही महागल्या आहेत. आयातीवर बंधने आल्याने बाजारपेठेत कमी पुरवठा होतो आहे. भारतीतील खेळण्यांपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती महागल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे चिनी मालाच्या आयातीवर बंधने आल्याने या वस्तूंची आवक घटली आहे.
गेल्या महिन्यापासून चिनी बाजारपेठ बंद आहे. परिणामी मागील महिन्याभरापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल वस्तूंचा कच्चा मालही जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे येत्या काळात चिनी वस्तूंचे दर आणखी महागण्याची चिन्ह आहेत.