Google Doodle: भारतीयांची सगळ्यात फेव्हरेट डिश म्हणजे पाणीपुरी. भारतातील सर्व भागात पाणीपुरी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. प्रत्येक राज्यात वेग-वेगळ्या नावाने ही पुणीपुरी ओळखली जाते. आज चक्का गुगललाही पाणीपुरीची भुरळ पडली आहे. आज जर तुम्ही गुगलचे होम पेज पाहिलं असेल तर त्यावर तुम्हाला पाणी पुरीचे डुडल दिसेल. आज या गुगल डुडलच्या निमित्ताने भारतात पाणीपुरीची सुरुवात कशी झाली व सर्वांत पहिल्यांदा पाणीपुरी कोणी बनवली. तसंच, भारतात त्याचा व्यवसाय किती आहे? याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. (PaniPuri Day)
12 जुलै 2015 साली इंदौरमध्ये पाणीपुरीसंदर्भात एक वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. इंदौरयेथील एका हॉटेलने 51 निरनिराळ्या फ्लेवर्सची पाणीपुरीच्या डिश तयार केल्या होत्या. त्यानंतर हा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर झाला होता. आजच्याचदिवशी ही घटना घडली होती. पण तुम्हाला हे माहितीये का पाणी पुरी बनवण्याची सुरुवात ही महाभारतात झाली आहे. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटलं ना. तर आज आपण पाणीपुरीचा इतिहास जाणून घेऊया.
पाणी पुरीचा संबंध हा महाभारताशी आहे. असं म्हणतात की, पांडव जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठी फारसे पदार्थ मिळत नसत. जेव्हा द्रौपदीकडे काही उरल्या सुरल्या भाज्या आणि पीठ शिल्लक असायचे. या पीठाच्या छोट्या-छोट्या पुऱ्या बनवून त्यात बटाटा आणि भाजी भरुन ती पांडवांना खायला द्यायची, अशी मान्यता आहे. तिथूनच पाणीपुरीची सुरुवात झाली, असं म्हटलं जातं. त्यावरुन भारतातच पाणीपुरीचा शोध लागला हे तर सिद्ध होते. काही तज्ज्ञांच्या मते, पाणीपुरीची सुरुवात मगध शासनकाळातही झाली होती. मात्र, याबाबत अद्याप ठोस पुरावे सापडत नाहीत.
भारतात पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. गोलगप्पा, पाणीपूरी व्यतिरिक्त पू्र्व भारतात पुचका, दक्षिणेकडील राज्यात हैदराबाद, तेलंगणामध्ये गुपशूप या नावानेही ओळखलं जातं. प्रत्येक राज्यातील पाणीपुरीचा स्वाद वेगळा असला तरी संपूर्ण भारतात प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे. प्रत्येक धर्माचे, पंथाचे व वयाचे लोक पाणीपुरीचा अस्वाद घेतात.
एका मीडीया रिपोर्टनुसार, भारतात पाणी पुरीचा व्यापार जवळपास 6,000 कोटींपेक्षा अधिक आहे. तर, प्रत्येकवर्षी 20 ते 22 टक्क्यांनी वाढतोय. पाणीपुरीच्या मागणीत सतत वाढ होत असते त्यामुळं नफ्यातही वाढ होते. एका तासात एक विक्रेता 4 हजार पाणीपुरी बनवू शकतो तर यातून तुम्ही कमीत कमी 800 ते 900 रुपयांपर्यंत कमाई करु शकतात.