नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतरचा अभूतपूर्व बदल असा ढोल वाजवत मोदी सरकारने देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केला. सरकारने जीएसटी लागू करून बरेच दिवस उलटले. पण, लोकांच्या मनात जीएसटीबद्धल असलेला संभ्रम अद्यापही दूर होऊ शकला नाही. असे असतानाच जीएटीबाबत आणखी एक धक्कादायक माहिती पूढे आली आहे. एखाद्या वातानुकूलीत (एसी) हॉटेलमधून तुम्ही जर खाद्यपदार्थाचे पार्सल घेतले, तर त्यालाही जीएसटी लागणार आहे. या पार्सलवर १८ टक्के जीएसटी लागेल. याचाच अर्थ असा की, तुम्ही हॉटेलमधल्या एसीतील गार हवेचा मोह टाळून घरी जरी हॉटेलचे पदार्थ खात बसला तरी, तुमची जीएसटीतून सुटका नाही.
जीएसटीबाबत लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी तसेच, लोकांकडून विचारल्या जाणाऱ्या सततच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सरकार जोमाने काम करत आहे. त्यासाठी उत्पादन शुल्क व सीमाशुल्क केंद्र मंडळ (सीबीईसी) जीएसटीबाबत लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना 'सीबीईसी'नेच ही नवी माहिती दिली आहे. 'जर एखाद्या हॉटेल किंवा बारच्या पहिल्या मजल्यावर एअर कंडिशन असेल आणि तळमजल्यावर जेथे एसी नसेल पण जेवणाची सोय असेल तर तेथेही जीएसटी आकारला जाईल असं', सीबीईसीने म्हटले आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही जर एअर कंडिशन (एसी) हॉटेलमधून जेवन पार्सल नेत असाल तर तुम्हालाही 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.
दरम्यान, १ जुलै 2017 पासून देशभरात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाला आहे. या तारखेपासून पूढे सर्व वस्तू आणि सेवांसाठी जीएसटी लागू आहे. त्यामुळे करआकारणीही तशीच होत आहे. त्यामुळे अनेक हॉटेलच्या दरात बदल झाला आहे.
- एसी नसलेल्या हॉटेलमध्ये जेवण केल्यास 12 टक्के जीएसटी
- एसी असलेल्या किंवा परवानाधारक बारमध्ये 18 टक्के जीएसटी
- पंचतारांकित हॉटेलमध्ये 28 टक्के जीएसटी