नवी दिल्ली : दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियन ट्रेडर्स'तर्फे चक्क जीएसटीच्या पोर्टलची पूजा करण्यात आली.
देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतरची आजची पहिलीच दिवाळी आहे. 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियन ट्रेडर्स'चे महासचिव संजीव खंडेलवाल यांनी ही पूजा केली. जीएसटीबाबत अद्याप काही तक्रारी असल्या तरी नव्या करप्रणालीकडून त्यांना बऱ्याच अपेक्षाही आहेत.
त्यामुळेच व्यापाऱ्यांनी थेट जीएसटीच्या वेबसाईटची पूजा करत येत्या वर्षात लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी, अशी प्रार्थना केली.
मुंबईतील जगप्रसिद्ध झवेरी बाजारमध्ये चोपडी पूजनानंतर दुपारच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केलीय. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या झवेरी मार्केटमध्ये पारंपरिक पद्धतीने सहपरिवार चोपडी पूजन आणि लक्ष्मी पूजन केले जातं.
तिथीनुसार सकाळी 10.57 ते दुपारी 3.18 हा अमृत मुहूर्त यंदा व्यापारी लक्ष्मीपूजनासाठी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे या दुपारच्या अमृत मुहूर्तावर झवेरी बाजार मधील व्यापा-यांनी लक्ष्मीपूजन केलं.